रक्षक हटविले, पेल्हार असुरक्षित
By Admin | Updated: March 1, 2016 02:01 IST2016-03-01T02:01:39+5:302016-03-01T02:01:39+5:30
नालासोपारा आणि वसई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणावरील सुरक्षा रक्षक हटवण्यात आल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

रक्षक हटविले, पेल्हार असुरक्षित
शशी करपे, वसई
नालासोपारा आणि वसई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणावरील सुरक्षा रक्षक हटवण्यात आल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. धरणात जिलेटीनचा स्फोट घडवून खुलेआम मासेमारी सुरु आहे. या परिसरात दारुच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत. कपल्सचा रोमान्स वाढला आहे. तबेल्यांनी अतिक्रमण करून धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याचे गोडाऊन बनवले आहे. यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली असून शहराच्या पाणीपुरवठ्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पूर्वी जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेले मातीचे पाझर धरण चारही नगरपालिकांनी २००१ साली आपल्या ताब्यात घेऊन त्याचे मजबूतीकरण केले होते. या धरणातून नालासोपारा शहराला दररोज ७.२ एमएलडी तर वसई शहराला एकदिवस आड ७.२ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या या धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. पालिकेने ठेका पद्धतीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर धरणावरील सहा सुरक्षा रक्षक काढून टाकण्यात आले आहेत. त्यानंतर याठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नाही. नालासोपारा शहराची लोकसंख्या तीन लाखाच्या घरात आहे, तर वसईची लोकसंख्या दोन लाखाच्या घरात आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने समाजकंटकांनी जर धरणाच्या पाण्यातूनं विषबाधा घडवून आणल्यास लाखो लोकांचा जीव धोक्यात येण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
धरणाचे मजबूतीकरण करण्यात आले असले तरी मासेमारी करणारे मोठ्या प्रमाणावर पात्रात जिलेटीनचे स्फोट घडवून आणत असल्याने त्याच्या हादऱ्याने धरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे जिलेटीनचे स्फोट घडवले जात असताना दुसरीकडे आंघोळ, गुरे-ढोरे आणि धुणी भांडी धुतली जात असल्याने धरणातील पिण्याचे पाणी दूषित होत असून लाखो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होतो आहे. या परिसरात आता पर्यटनाच्या नावाखाली खुलेआम पार्ट्या झडू लागल्या आहेत. कुणी हटकणारे नसल्याने या परीसरात तरुणाईच्या रोमान्सला ऊत आला आहे.
धरणाच्या परिसरात शेकडो तबेले असून बहुतांशी बेकायदा आहेत. धरण परिसरात ठराविक अंतरावर बोअरवेल खोदण्यास मनाई आहे. असे असताना तबेला मालक शेकडो बोअरवेल मारून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे मूळ पाझर तलाव असलेल्या धरणातील पाणी साठयावर परिणाम होऊन एप्रिल-मे महिन्यात त्यातील पाणीसाठा खूप कमी होत असतो. त्यामुळे नालासोपारा आणि वसई शहरातील पाणी पुरवठयावर परिणाम होऊन लोकांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. धरणाचा परिसर तबेल्यातील घाणीने भरून गेलेला असतो. तबेल्यांनी धरणाच्या आणि सरकारी मालकीच्या जागेवरही अतिक्रमण केले आहे. आता धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गवताच्या गंजी टाकून तो व्यापून टाकण्यात आला आहे.