पीडितेशी लग्नाचा प्रस्ताव हा स्त्रीत्वाचा अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 01:01 AM2021-03-05T01:01:32+5:302021-03-05T01:01:47+5:30

महिला संघटनांचा प्रखर विरोध 

Proposing marriage to a victim is an insult to femininity | पीडितेशी लग्नाचा प्रस्ताव हा स्त्रीत्वाचा अपमान

पीडितेशी लग्नाचा प्रस्ताव हा स्त्रीत्वाचा अपमान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बलात्कार करणाऱ्या पुरुषाला पीडितेशी लग्न करणार का, हे विचारणे म्हणजे स्त्रीत्वाचा अपमान आहे. अगोदरच तिच्यावर मोठा अत्याचार झाला असताना तिची संमती न घेताच आरोपीला असा प्रस्ताव देणे हे बलात्कारासारख्या भीषण गुन्ह्याचे महत्त्व कमी करण्यासारखे असल्याचे स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या, महिला वकील, शिक्षिका यांचे म्हणणे आहे. 
सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात केलेल्या टिप्पणीवर नाराजीचे सूर प्रकट होत आहेत. हा प्रस्ताव ताळतंत्र सोडल्याचे लक्षण आहे. लग्न आणि गुन्हा या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कोणत्याही स्त्रीवर बलात्कार करणे हा कायद्याने गुन्हाच आहे. बलात्कारी पुरुष लग्नाला तयार झाला तर त्याला शिक्षा करणार नाही का? गेल्या काही वर्षांतील निकाल परंपरावादी आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणारे आहेत. न्यायाची गंगा उलटी फिरवण्यासारखे आणि संविधान धाब्यावर बसविणे आहे. काही वर्षांपूर्वी असाच प्रस्ताव ठेवण्याची घटना घडली होती तेव्हाच भारतातील सर्व स्त्री संघटनांनी त्याचा निषेध केला होता. पुन्हा असाच निषेध करावा लागतो ही दुर्दैवाची बाब आहे, अशी तिखट प्रतिक्रिया स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी दिली. 
भारतीय महिला फेडरेशनच्या सदस्या वंदना शिंदे म्हणाल्या, बलात्कारी पुरुषाशी लग्न करण्याचा प्रस्ताव म्हणजे त्या स्त्रीची परत विटंबना आहे. अशा प्रस्तावामुळे त्या स्त्रीचा स्वाभिमान किती दुखावला जातो याचा सखोल विचार करावा. अल्पवयीन मुलीवर बलात्कार हा मोठा गुन्हा आहे. अशा प्रस्तावामुळे  गुन्हेगारांना मोकळीक मिळेल. 
लैंगिक अत्याचार ही घटना पीडितेवर लादली गेलेली असते. त्याच आरोपीशी आयुष्यभर लग्नगाठ बांधायला भाग पाडणे याचा अर्थ त्या स्त्रीवर दररोज मानसिक, शारीरिक अत्याचाराची परवानगी देण्यासारखे आहे. स्त्रीचा मान कोर्टानेच राखला नाही, तर समाज काय राखणार? ज्या स्त्रीवर अत्याचार झालाय तिला आता कोणीच स्वीकारणार नाही, असा गर्भित अर्थ या प्रस्तावात दडला असल्याचे मत वकील अनुराधा परदेशी यांनी व्यक्त केले. तिच्या मनाचा विचार न करता आरोपीला ‘चॉईस’ दिला जातोय हे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
याच न्यायाने दरोडा टाकून लूटमार करणाऱ्याला तुला त्या घराचा मालक होऊन  त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा आहे का, असा प्रश्नही उद्या न्यायव्यवस्थेकडून विचारला जाईल का, असा प्रतिसवाल सामाजिक कार्यकर्ती सुमिता दिघे यांनी केला.  

‘बलात्काराचा गुन्हा तडजोडीने सुटूच शकत नाही’
ख्यातनाम लेखक व. पु. काळे यांनी लिहून ठेवले आहे की, सतराव्या वर्षी झालेल्या बलात्कारावर आज सत्तराव्या वर्षी निकाल देताना पुन्हा बलात्कार केला गेला. या वाक्याची आज पुन्हा आठवण झाली, असे नमूद करून शिक्षिका व निवेदिका साधना जोशी 
म्हणाल्या की, काळ बदलला पण , स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलली नाही. स्त्री ही पूर्वी उपभोग्य वस्तू होती व आजही आहे. स्त्रीच्या संपूर्ण भावनिक, शारीरिक, मानसिक विश्वाला उद्ध्वस्त करणाऱ्या बलात्कार करणाऱ्यासोबत कुठली 
स्त्री संसार करू शकेल? बलात्कार करा आणि लग्न करून मोकळे व्हा, असा विकृत पायंडा त्यातून पडेल. सारा फाउंडेशनच्या अध्यक्षा सारंगी महाजन यांनी बलात्कार हा तडजोडीने सोडविण्याचा गुन्हा असूच शकत नाही, असे मत व्यक्त केले.
 

Web Title: Proposing marriage to a victim is an insult to femininity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.