प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सव्वातीनशे खाटा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST2021-07-27T04:41:38+5:302021-07-27T04:41:38+5:30
ठाणे : गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाहिले जाते. त्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर पालघर जिल्ह्यातूनही रुग्ण ...

प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सव्वातीनशे खाटा वाढणार
ठाणे : गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाहिले जाते. त्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर पालघर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथे गोरगरीब रुग्णांना उच्च व उत्तम दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी या रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यात येत आहे. सुरुवातीला ५७४ खाटांच्या बेडला हिरवा कंदील सरकारने दिला आहे; मात्र भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आता ते ९०० खाटांचे करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविला आहे.
ठाणे जिल्ह्याचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून रुग्णालयावर ताण वाढत आहे. त्यात काहीवेळा गंभीर आजाराकरिता रुग्णांना उपचार मिळत नाही आणि रुग्णांची दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची धावाधाव सुरू होते. याची गांभीर्याने दाखल घेऊन दोन वर्षांपूर्वी सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याला राज्य शासनाने मंजुरी देऊन ३१४ कोटींचा निधी दिला; मात्र नंतर कोरोनाच्या महामारीमुळे पुढच्या गोष्टींना विलंब झाला; परंतु आता हे रुग्णालय आणखी मोठे करण्याच्या प्रस्तावाबाबत विचारविनिमय सुरू आहे. खाटांची संख्या वाढवून ते आणखी सुसज्ज केले जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावावर लवकरच मंत्रालयातून शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
सध्या ५७४ खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे ठरले होते; मात्र भविष्यातील जिल्ह्यातील वाढत्या नागरिकीकरण व लोकसंख्येचा विचार करता खाटांची संख्या वाढवणे क्रमप्राप्त आहे. रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय प्रशासनाने विचार करून वास्तू उभी राहण्यापूर्वी खाटांची संख्या ९०० करून तसा नवा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवला आहे. यामध्ये २०० सुपर स्पेशालिटी, २०० लहान मुले, डिलिव्हरी आणि महिला आणि ५०० खाटा जनरल रुग्णासाठी ठेवण्याचे सुचविले आहे. यात जनरल खाटामध्ये आर्थो, डोळे, रक्ताचे आजार, ज्येष्ठ नागरिक, डायलिसिस,आयसीयू नाक, कान, घसा आदी सर्वांचा समावेश असणार आहे. हॉस्पिटल उभारणीचा खर्च वाढून अंदाजे ५२७ कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
...............
नव्या रुग्णालयाच्या इमारतीत दोन बेसमेंट, ग्राउंडफ्लोअर, सोबतच टेरेसवर हेलिपॅड बांधले जाणार आहे. रुग्णाला इमर्जन्सीमध्ये आणायचे झालेच तर एअर ॲम्ब्युलन्सने आणण्याची सोय केली जाणार आहे. तसेच नवा प्रस्ताव सादर केल्यानंतर शासनाकडून काढण्यात आलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
--