‘त्या’ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव सरकारकडे
By Admin | Updated: November 15, 2016 04:26 IST2016-11-15T04:26:51+5:302016-11-15T04:26:51+5:30
येथील पी. सावळाराम क्रीडासंकुलातील जलतरण तलावाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव

‘त्या’ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव सरकारकडे
डोंबिवली : येथील पी. सावळाराम क्रीडासंकुलातील जलतरण तलावाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची नुकतीच त्या कर्मचाऱ्यांनी भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान शिंदे यांनी देवळेकर यांना जलतरण तलावातील जीवरक्षक आणि प्रशिक्षक यांच्या कायम नोकरीसंदर्भातील अर्जाचे काय झाले, असा सवाल केला. त्या वेळी त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.
जलतरण कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाला ‘लोकमत’ने वाचा फोडली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने सरकारकडे पाठवला आहे. त्यासंदर्भात डिसेंबरमध्ये माहिती घेतली जाईल, असे देवळेकर यांनी सांगितले. तसेच सध्याच्या कंत्राटदाराला त्या सात कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात सूचना देणार असल्याचे सांगितले. सध्याचे मानधन तुटपुंजे असल्याने अन्य भत्ता देता येतो का, यासंदर्भात कंत्राटदाराशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात माहिती घेतली. तसेच त्यांना भेटण्यासही सांगितले होते. मात्र, देवळेकर आणि डॉ. शिंदे यांनी लक्ष घातले आहे. आवश्यकता असल्यास शिंदे यांची निश्चितच भेट घेऊ, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यावर, पालकमंत्र्यांनीही समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)