टीएमटीच्या ताफ्यात खाजगी वाहक येणार
By Admin | Updated: January 25, 2017 04:38 IST2017-01-25T04:38:26+5:302017-01-25T04:38:26+5:30
परिवहनचा कारभार न सुधारल्यास भविष्यात या टीएमटीचे खाजगीकरण करावे लागेल असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला होता.

टीएमटीच्या ताफ्यात खाजगी वाहक येणार
ठाणे : परिवहनचा कारभार न सुधारल्यास भविष्यात या टीएमटीचे खाजगीकरण करावे लागेल असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला होता. त्यानुसार आता त्याचे पहिले पाऊल पडले असून कंत्राटी स्वरुपात ४०० वाहकांसाठी टीएमटीत भरती करण्याचा घाट घातला जात आहे. हे काम एका खाजगी एजन्सीला दिले असून संबधीत एजन्सी ही स्वत:चे नियम आणि अटी लावून नोंदणीच्या नावाखाली प्रत्येक उमेदवाराकडून ३ हजार रुपये उकळत आहे. परंतु, ऐन निवडणूक काळातच ही भरती सुरु झाल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलीतच मिळाल्याचे दिसत आहे.
ठाणे परिवहनचा कारभार काही केल्या सुधारतांना दिसत नाही. त्यात जेएनएनयूआरएमअंतर्गत येत असलेल्या बस या खाजगी ठेकेदाराला चालविण्यासाठी दिल्या आहेत. यामध्ये प्रती किमीचा दरदेखील नवी मुंबईच्या तुलनेत अधिक दिला आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन भ्रष्टाचाराचे आरोप परिवहनवर केले जात असतांनाच आता कंत्राटी स्वरुपात केली जाणारी वाहकांची भरतीदेखील टिकेची धनी होणार असल्याचे दिसत आहे. परिवहन सेवेमध्ये एकूण २१८६ कर्मचारी आहेत. यामध्ये ४०० च्या आसपास वाहकांची संख्या आहे. परंतु, आता पुन्हा नव्या बससाठी ४०० कंत्राटी स्वरुपातील वाहक घेण्याचे निश्चित केले आहे. ते घेण्याचे अधिकार देखील एका खाजगी एजन्सीला दिले आहेत. त्यांच्या माध्यमातूनच सर्व भरती प्रक्रि या राबवण्यात येत असून कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या सर्व वाहकांच्या पगारापासून ते सर्व कारभार एजन्सीच चालवणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून एजन्सीला काही ठराविक रक्कम दिली जाणार आहे. वाहकांच्या ही भरतीला इच्छुकांचा प्रतिसादही चांगला आहे. तिचे सर्व अधिकार या एजन्सीला दिले असून प्रशासनाचा यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याने एजन्सीने स्वत:चे नियम लादून इच्छुक उमेदवारांकडून नोंदणीच्या नावाखाली ३ हजार रु पये घेण्यास सुरु वात केली आहे. सुरु वातीला पैसे घेतल्याची पावतीदेखील दिली जात नसून नातेवाईक किंवा ओळखीच्या उमेदवारांचीच निवड होत असल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला आहे.