विसर्जनासाठी जय्यत तयारी

By Admin | Updated: September 26, 2015 23:00 IST2015-09-26T23:00:19+5:302015-09-26T23:00:19+5:30

गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी जिल्हाभरात सुमारे ३१ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

Preparations for the city to be immersed | विसर्जनासाठी जय्यत तयारी

विसर्जनासाठी जय्यत तयारी

ठाणे : गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी जिल्हाभरात सुमारे ३१ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विसर्जन ठिकाणी आणि विसर्जन मार्गांवर ३०० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ५०२ सार्वजनिक तर ५ हजार ७४९ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. तर, ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये ६६६ सार्वजनिक आणि २४ हजार ६६ घरगुती बाप्पांना साश्रुनयनाने निरोप दिला जाणार आहे. या गणेशमूर्तींच्या विसर्जन सोहळयासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून जादा बंदोबस्त तैनात केला आहे. ठाणे महापालिकेने या वर्षीही इकोफ्रेंडली गणेशोत्सव संकल्पना राबवित गणेशमूर्ती विसर्जनाकरिता विशेष कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. रायलादेवी, उपवन, आंबे-घोसाळे, टिकूजिनीवाडी, बाळकूम, खारेगाव आदी ठिकाणी त्यांची निर्मिती केली आहे. याठिकाणी निर्माल्य कलशही उभारले आहेत. तसेच तलावांच्या ठिकाणी वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, खाद्यपदार्थ स्टॉल, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधाही उपलब्ध करु न दिली आहे. ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाकरीता येणे शक्य नाही, अशांसाठी मूर्ती स्वीकार केंद्रेही उभारण्यात आली आहेत. या विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये अधिकाधिक रंगत आणण्यासाठी ढोल पथकांना विशेष मागणी असल्याने पुणे आणि नाशिकमधून ती मोठ्या संख्येने ठाण्यात दाखल झाली आहेत.
------------
१०९ ठिकाणी होणार विसर्जन
ठामपाने गणेश विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. यामध्ये रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन नीळकंठ ग्रीन (टिकुजिनी वाडी) येथे कृत्रिम तलावांची निर्मिती आहे. मासुंदा तलाव येथील दत्तघाट आणि आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व पर्यायी व्यवस्था केली आहे. पारसिक रेतीबंदर आणि कोलशेत, कोपरी येथे विसर्जन महाघाट, मानपाडा, कळवा आणि मुंब्रा यांच्यासह कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगर, अंबरनाथ -बदलापूर अशा १०९ ठिकाणी बाप्पांचे विधीवत विसर्जनाची सोय केली आहे.
-----------
भार्इंदरला मुख्य मार्गावरील वाहतुकीत बदल
भार्इंदर : अनंत चतुर्थीला होणाऱ्या गणेश विसर्जन दरम्यान केवळ मुख्य मार्गावरील वाहतुकीत बदल केल्याचे पोलिस उपअधिक्षक सुहास बावचे यांनी सांगितले. गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी एकुण ५५० पोलिस कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती केली असून त्यात १ अतिरिक्त अधिक्षक, ४ उपअधिक्षक, ४५ अधिकारी व ५०० कर्मचाऱ्यांचा समोवश आहे. त्याचप्रमाणे ५० होमगार्ड, ८० वाहतूक कर्मचारी व ट्रॅफीक वॉर्डन, दंगल नियंत्रण पथक, महिलांसाठी छेडछाड विरोधी पथके, घातपात विरोधी पथके विसर्जन मार्गांसह विसर्जन स्थळी तैनात केली आहेत. तसेच शीघ्र कृती दलाच्या तीन पथकांना पाचारण केले असून ते प्रत्येकी काशिमिरा, मीरारोड व नवघर परिसरात सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
विसर्जन स्थळे :
१) भार्इंदर पश्चिमेकडील खाडीसह मांदली, राव, मुर्धा, राई व मोर्वा तलाव, उत्तन परिसरासाठी नवी खाडी २) भार्इंदर पुर्वेस जेसलपार्क चौपाटी, गोडदेव, नवघर तलाव ३) काशिमिरा येथे जरीमरी, सुकाळा, एमआयडीसी तलाव, घोडबंदर येथे चेना नदी, काजुपाडा खदान, रेतीबंदर, संक्रमण शिबिराजवळील तलाव ४) मीरारोड येथे शिवार गार्डन तलावात विसर्जनाची सोय केली असून प्रत्येक ठिकाणी विसर्जनासाठी विशेष मनुष्यबळ नियुक्त केले आहे.
पालिकेनेही सुमारे ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची विसर्जनस्थळी नियुक्त केली असून महत्त्वांच्या विसर्जनस्थळी रुग्णवाहिकांसह डॉक्टर्स, परिचारिका, आवश्यक औषधांचा साठा, अग्निशमन दलांच्या गाड्या व जवान सज्ज ठेवले आहेत. उर्वरीत ठिकाणी डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. भार्इंदर खाडीसह जेसल पार्क चौपाटी येथे प्रत्येकी १ मोठी क्रेन, प्रत्येकी २ फोरक्लिप, तराफे, व हायमास्टची सोय केली आहे.
---
पोलिसांच्या सहकार्यासाठी यंदा प्रथमच मुस्लिम समाजातील १०० स्वयंसेवक घेण्यात आले असून त्यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे १५०, राष्ट्रीय छात्र सेनेचे ६० व इतर सामाजिक संस्थांचे २०० स्वयंसेवकांना सहभागी करुन घेण्यात आले आहे.
शहरभर सुमारे ८० हुन अधिक सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
विसर्जनसाठी भार्इंदर पश्चिमेकडील भार्इंदर पोलीस ठाणे ते खाडी पर्यंतचा मुख्यमार्ग व भार्इंदर पश्चिमेकडील गोल्डन नेस्ट वाहतूक बेट ते फाटक मार्गे स्टेशन रोड व जेसलपार्क चौपाटी दरम्यानच्या मुख्यमार्गावर रिक्षा, बस आदी सार्वजनिक वाहनांना सायंकाळी ४ ते रात्री १०.३० वा. पर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे. ----------
काही ठळक नियोजन
गणेशोत्सव विसर्जनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे.
यंदा प्रथमच इंडो तिबेटीयन बॉर्डर फोर्सच्या जवानांना पाचारण केले आहे. त्यांच्यासोबत होमगार्डची फौज तैनात असेल.
विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी गुन्हे अन्वेषण शाखा व विशेष शाखेच्या पोलिसांची साध्या वेषातील पथके मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत.
मद्य प्राशन करु न विसर्जनात धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यासाठी खास एक पथक देखील तैनात करण्यात येणार असून ते ब्रीथ अ‍ॅनालायझरच्या सहाय्याने तपासणी करु न त्यांच्याविरु द्ध कारवाई करणार आहे. यामुळे अशा मद्यपींना आळा बसण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Preparations for the city to be immersed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.