ईदची जय्यत तयारी
By Admin | Updated: September 22, 2015 03:34 IST2015-09-22T03:34:50+5:302015-09-22T03:34:50+5:30
मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र समजली जाणारी बकरी ईद २४ सप्टेंबर रोजी असून त्यासाठी पालघर जिल्ह्यातील मुस्लिमबहुल वस्ती असलेल्या पालघर,

ईदची जय्यत तयारी
डहाणू : मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र समजली जाणारी बकरी ईद २४ सप्टेंबर रोजी असून त्यासाठी पालघर जिल्ह्यातील मुस्लिमबहुल वस्ती असलेल्या पालघर, मनोर, बोईसर, डहाणू, चिंचणी, तारापूर, कासा, वरोती, सावटा येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीसाठी खासकरून अजमेर, राजस्थान तसेच गुजरात राज्यातील सुरत येथून हजारो बकऱ्या महिनाभरापासून जिल्ह्यातील पालघर, बोईसर, डहाणू तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या चारोटी, मस्ताननाका, विरारफाटा येथे विक्रीसाठी दरवर्षी येत असतात. आवडीचा बकरा खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे.
बकरी ईदच्या दिवशी सकाळी सामुदायिक नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधव एक-दुसऱ्यांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत असतात. त्यानंतर, लगेच कुर्बानीची तयारी केली जाते. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम समाजातील लोक हजारो बोकडांची कुर्बानी देत असतात. या बकऱ्या राजस्थान, अजमेर, मारवाड, सौराष्ट्र, सुरत येथून आणल्या जातात. येणाऱ्या बकऱ्यांचे जातीप्रमाणे दर निश्चित करण्यात येतात.
खस्ती बकरा तसेच गावठी बोकड दहा हजारांपासून लाख रु.पर्यंत किमतीचा असतो. परंतु, या वर्षी बकऱ्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. या वर्षी बकऱ्यांच्या किमती गेल्या वर्षीपेक्षा तिपटीने वाढल्या असल्या तरी हजारो मुस्लिम बांधवांच्या घरोघरी कुर्बानीचे बकरे दिसत असून संध्याकाळच्या सुमारास बाजारपेठेत सुंदर, उंच व वजनदार बकरे पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, शिरगाव, सातपाटी, चिंचणी, तारापूर, बोईसर, सावटा, वरोती, कासा, चारोटी या भागांतील मुस्लिम बांधवांनी बकरी ईदनिमित्त मशीद, दरगाहला रंगरंगोटी करून सर्वत्र रोषणाई करू न बकरी ईदची जोरदार तयारी सुरू केली आहे. (वार्ताहर)