प्रसाद वाटणा-या सार्वजनिक मंडळांची होणार नोंदणी
By Admin | Updated: August 27, 2014 00:04 IST2014-08-27T00:04:08+5:302014-08-27T00:04:08+5:30
नव्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी प्रसाद वाटणा-या मंडळांची यंदापासून अन्न व औषध प्रशासन विभाग नोंदणी करणार आहे.

प्रसाद वाटणा-या सार्वजनिक मंडळांची होणार नोंदणी
ठाणे : नव्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी प्रसाद वाटणा-या मंडळांची यंदापासून अन्न व औषध प्रशासन विभाग नोंदणी करणार आहे. तसेच ज्या ठिकाणी प्रसादाचे वाटप केले जाणार आहे, त्यांना काही गाइड लाइन्सही घालून दिल्या आहेत. त्यामुळे मंगलप्रसंगी कोणतेही विघ्न येऊ नये म्हणूनही खबरदारी घेण्याचे आवाहन गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांना प्रशासनाने केले आहे.
सार्वजनिक उत्सवात अन्नविषयक सेवांचा समावेश होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने प्रसाद करताना जागा, भांडी स्वच्छ व आरोग्यदायी असावीत, यावर भर देऊन त्यासाठी लागणारा कच्चा माल (अन्नपदार्थ) परवानाधारक व्यावसायिकांकडून खरेदी करावा. फळांचा प्रसाद म्हणून वाटप करताना फळांची खरेदी परवानाधारकांकडून करावी तसेच कच्च्या किंवा खराब फळांचा वापर टाळावा. प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहील, याची खात्री करून आवश्यक तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी. त्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असावे. ते वाटप करणाऱ्या स्वयंसेवकांस अॅप्रन, ग्लोव्हज, टोपी इत्यादी देण्याबरोबर प्रत्येक वेळी हात धुवावेत, असे सुचवले आहे. त्याचबरोबर प्रसादासाठी खवा किंवा माव्याचा वापर होत असल्यास अतिदक्षता घ्यावी.
दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ विशेषत: ४ सेल्सिअस अथवा कमी तापमानावरच साठवून ठेवावे. तसेच ते वाहनातूनच आणावे. विशेष म्हणजे शिळा किंवा अनेक दिवस कोल्ड स्टोअरेज केलेला मावा प्रसादासाठी वापरू नये. प्रसाद बनवणाऱ्या मंडळांनी प्रसादाच्या कच्च्या मालासह तो तयार करणाऱ्या आणि त्याचे वितरण करणाऱ्यांची इत्थंभूत माहिती घ्यावी.
तसेच तपासणीसाठी आलेल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना एका जबाबदार व्यक्तीद्वारे माहिती द्यावी. काही संशय असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)