मजूर टंचाईवर पॉवर टिलरचा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:55 IST2020-06-21T00:55:21+5:302020-06-21T00:55:27+5:30
मजुरांची शोधाशोध करण्याच्या समस्येतून मुरबाड, शहापूर , भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.

मजूर टंचाईवर पॉवर टिलरचा उतारा
ठाणे : जिल्ह्यात भातलागवडीसाठी शेतीची मशागत सुरू आहे. या कामातील पुरुषांची मक्तेदारी मोडून पॉवर टिलरच्या सहाय्याने महिला बचतगटातील महिला अत्यल्प मोबदला घेऊन कमी वेळेत शेताची मशागत करून देण्यासाठी ग्रामीण भागात सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे मजुरांची शोधाशोध करण्याच्या समस्येतून मुरबाड, शहापूर , भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाद्वारे कृषी औजार बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकेद्वारे जिल्ह्यातील सक्रिय महिला बचतगटांना ट्रँक्टर, पॉवर टिलर, भात लागवड-कापणीचे यंत्र, मळणी यंत्र आदी सात प्रकारची औजारे शेतीच्या कामांसाठी दिली आहेत. मजूर नसल्याच्या कारणाखाली कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतीचे काम आता पडून न राहता या बचतगटांच्या महिला स्वत: औजारे हाताळून सर्व शेतकºयांच्या शेतीची कामे करून देत आहेत. यासाठी कमी मोबदला देऊन काही तास आधी शेतीची कामे महिला करत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी मुरबाड तालुक्यातील सक्रिय महिला बचतगटांवर लक्ष केंद्रित करून या बचतगटांसाठी शाश्वत उपजीविकेचे साधन म्हणून औजार बँक ही योजना राबवली आहे.
एका बाजूला जिल्ह्यात शेती कमी होत असताना दुसरीकडे आधुनिक पद्धतीने शेती केली जात असल्याने ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.
>महिलांचा चांगला प्रतिसाद
बळेगाव येथील प्रगती महिला बचत गटाच्या अध्यक्ष योगिता शिर्के यांनी बचत गटाला मिळालेल्या साहित्यातील पॉवर टिलर स्वत: मुरबाडच्या बाळेगाव येथील शेतांमध्ये चालवत भातलागवडीसाठी शेतीची मशागत करत आहेत. अन्य तालुक्यांत महिला बचत गट या अवजार बँकेच्या साधनांद्वारे शेतीच्या ओखरणीसह पेरणी, भातलागवड आदी कामे करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत, असे कृषी अधिकारी अंकुश माने आणि जि.प.चे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी सांगितले.