प्रदूषण नियंत्रण मंडळ ढिम्मच; दर्पाचा त्रास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:37 AM2019-11-19T00:37:22+5:302019-11-19T00:37:29+5:30

रहिवाशांच्या झोपेचे झाले खोबरे

Pollution control board; The tragedy continues | प्रदूषण नियंत्रण मंडळ ढिम्मच; दर्पाचा त्रास सुरूच

प्रदूषण नियंत्रण मंडळ ढिम्मच; दर्पाचा त्रास सुरूच

Next

डोंबिवली : खंबाळपाडा येथील प्रदूषणाला भंगारवाला कारणीभूत असल्याचा दावा कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशन (कामा) या कारखानदारांच्या संघटनेने केला असतानाच वायुप्रदूषण या भागात कायम आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी दिवसभर पुन्हा येथे उग्र दर्प सुटल्याने रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होत नसल्याने रहिवाशांच्या रात्रीच्या झोपेचे अक्षरश: खोबरे झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून खंबाळपाडा भागात वायुप्रदूषणाची तीव्रता अधिक जाणवत आहे. या प्रदूषणामुळे पसरलेल्या दर्पाचा त्रास ठाकुर्ली परिसरातील ९० फुटी रोड परिसरातही जाणवत आहे. दरम्यान, या त्रासाबाबत खंबाळपाडा, भोईरवाडी भागातील स्थानिक रहिवाशांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीकडे तक्रार केल्यानंतर तीन दिवस प्रदूषणाचा त्रास थांबला होता. तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत ड्रेनेजवाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्याने रंगमिश्रित सांडपाणी नाल्यातून वाहताना आढळून आले. या सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी अधिकाऱ्यांनी घेतले होते. त्याचा अहवाल येणे अपेक्षित असताना ‘कामा’ने रविवारी प्रसिद्धिपत्रक काढून रंगांनी माखलेल्या गोण्या धुण्याचे काम खंबाळपाडा, भोईरवाडी येथील नाल्यात भंगारवाला धूत असतो. त्यामुळे त्या नाल्यातील पाण्याला विचित्र रंग येत आहे. तोच प्रदूषणाला कारणीभूत असून त्याला सक्त ताकीद दिल्याकडे लक्ष वेधले होते. विशेष बाब म्हणजे ‘कामा’सोबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही होते.

दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून सुटलेल्या दर्पामुळे स्थानिक नागरिकांना डोळे जळजळणे, मळमळणे आणि उलट्यांचा त्रासही झाला. कामा संघटनेने केलेला दावा पाहता कारखान्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांचीही त्याला साथ असल्याचा आरोप रहिवासी काळू कोमास्कर यांनी केला आहे. संबंधित यंत्रणांचा खोटारडेपणा सुरू असून आता तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.

रहिवाशांनी घातला घेराव
यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागीय अधिकारी शंकर वाघमारे म्हणाले, संबंधित प्रदूषण नाल्यातील सांडपाण्यामुळे होत नसून ते वायुप्रदूषण आहे. पुन्हा त्रास सुरू झाला असेल तर आमचे अधिकारी घटनास्थळी पाठवतो, असे सांगितले होते.

सायंकाळीही दर्पाचा त्रास कायम राहिल्याने रहिवाशांनी एकत्र जमा होत कंपनीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तेथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी पाठविण्यात आला नव्हता, त्याऐवजी कामा संघटनेच्या एका माजी पदाधिकाºयाला तेथे पाठविल्याने संतप्त रहिवाशांनी त्याला घेराव घालून जाब विचारला. तसेच हा दर्प कुठून येतो, याची शोधमोहीम रहिवाशांकडून सुरू होती.

Web Title: Pollution control board; The tragedy continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.