गॅसगळतीप्रकरणी नोबेल इंटरमीडिएट्सला उत्पादन बंद करण्याचे दिले आदेश , प्रदूषण मंडळाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 08:31 IST2021-06-06T08:30:55+5:302021-06-06T08:31:17+5:30
gas leak case : या घटनेनंतर शनिवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे आणि त्यांच्या पथकाने बदलापूर एमआयडीसीत जाऊन नोबेल इंटरमीडिएट्स कंपनीची पाहणी केली.

गॅसगळतीप्रकरणी नोबेल इंटरमीडिएट्सला उत्पादन बंद करण्याचे दिले आदेश , प्रदूषण मंडळाची कारवाई
अंबरनाथ : बदलापूर एमआयडीसीतील नोबेल इंटरमीडिएट्स कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना गॅसगळती झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. याप्रकरणी आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
बदलापूर एमआयडीसीतील नोबेल इंटरमीडिएट्स कंपनीत सल्फ्युरिक ॲसिड आणि मिथाइल बेंझाइन या दोन रसायनांवर रिॲक्टरमध्ये प्रक्रिया केली जात असताना त्यात सल्फ्युरिक ॲसिड जास्त पडून दाब वाढल्यामुळे रिॲक्टरमधून गॅसची गळती झाली. काही क्षणांतच हा गॅस बदलापूर शहरात पसरल्यामुळे अनेकांना श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, असे त्रास सुरू झाले. यानंतर अग्निशमन दलाने तासाभरात ही गळती रोखली.
या घटनेनंतर शनिवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे आणि त्यांच्या पथकाने बदलापूर एमआयडीसीत जाऊन नोबेल इंटरमीडिएट्स कंपनीची पाहणी केली. यावेळी ज्या रसायनांची निर्मिती आणि प्रक्रिया करण्याचे काम सुरू असताना गॅस गळतीचा प्रकार घडला, त्या रसायनांची निर्मिती करण्याची परवानगीच या कंपनीकडे नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे या कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले. अग्निशमन दलाने तासाभरात ही गळती रोखली होती.
रासायनिक कंपन्यांवर अंकुश ठेवण्याची गरज
अंबरनाथ आणि बदलापूर एमआयडीसीत अशाच पद्धतीने अनेक रासायनिक कंपन्या परवानगी नसतानासुद्धा रासायनिक प्रक्रिया करत असून, त्यामुळेच काही दिवसांपूर्वीच अंबरनाथमध्ये रासायनिक प्रदूषणाच्या सलग दोन घटनादेखील समोर आल्या होत्या. त्यामुळे रासायनिक कंपन्यांवर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.