पोलीस म्हणतात, तपास करायला शिल्लक काय?
By Admin | Updated: July 7, 2016 02:45 IST2016-07-07T02:45:59+5:302016-07-07T02:45:59+5:30
एमआयडीसीमधील प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटाच्या घटनेला महिना उलटून गेला तरी पोलिसांकडूनही या घटनेचा तपास संथ गतीने सुरू आहे. स्फोटाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार

पोलीस म्हणतात, तपास करायला शिल्लक काय?
डोंबिवली : एमआयडीसीमधील प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटाच्या घटनेला महिना उलटून गेला तरी पोलिसांकडूनही या घटनेचा तपास संथ गतीने सुरू आहे. स्फोटाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि पुरावाच उपलब्ध नसल्याने तपास काय करणार, असा सवाल मानपाडा पोलीस ठाण्याने केला आहे.
प्रोबेस रासायनिक कंपनीत २६ मे रोजी भीषण स्फोट झाला. या स्फोटात कंपनी उद्ध्वस्त झाली. त्या ठिकाणी २५ फूट खोल खड्डा पडला. घटनेत कंपनीच्या मालकाची दोन मुले व सून यांच्यासह १२ जणांचे प्राण गेले. अनेक जण जखमी झाले. अनेक मालमत्तांचे नुकसान झाले. या प्रकरणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीमालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेत कंपनीमालकाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. घटनास्थळी आढळून आलेल्या रसायनांचे नमुने गोळा करून पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीस पाठवले. प्रयोगशाळेकडून अद्याप अहवाल आलेला नाही.
सरकारने स्फोटाचे कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नेमली. त्या समितीत कल्याण पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतूनच अहवाल प्राप्त न झाल्याने समितीही निष्कर्षाप्रत येऊ शकलेली नाही. हा अहवाल नेमका किती दिवसांत मिळाला पाहिजे, किती दिवसांत तो मिळणे बंधनकारक आहे, याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. स्फोटात प्रोबेस कंपनी पूर्णपणे भस्मसात झालीच, त्याचबरोबर शेजारी असलेल्या अन्य सहा कंपन्यांचेही नुकसान झाले.
पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा विभाग व अन्य संबंधित विभागांच्या हलगर्जी व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी होत आहे.