इमारत बांधकाम दरम्यान आणखी एका कामगाराच्या मृत्यू, पोलिसांचे भाजपाशी संबंधित बिल्डरला संरक्षण
By धीरज परब | Updated: June 12, 2024 21:04 IST2024-06-12T21:03:37+5:302024-06-12T21:04:01+5:30
मीरारोड मध्य भाजपाशी संबंधित विकासक - ठेकेदार याच्या इमारत बांधकाम दरम्यान आणखी एका मजुराचा सुरक्षे अभावी पडून मृत्यू झाला असताना त्यात मीरारोड पोलिसांनी विकासकाला आरोपी करणे टाळले असल्याने टीका होत आहे .

इमारत बांधकाम दरम्यान आणखी एका कामगाराच्या मृत्यू, पोलिसांचे भाजपाशी संबंधित बिल्डरला संरक्षण
मीरारोड - मीरारोड मध्य भाजपाशी संबंधित विकासक - ठेकेदार याच्या इमारत बांधकाम दरम्यान आणखी एका मजुराचा सुरक्षे अभावी पडून मृत्यू झाला असताना त्यात मीरारोड पोलिसांनी विकासकाला आरोपी करणे टाळले असल्याने टीका होत आहे . ह्या आधी देखील सदर विकासक कम ठेकेदारावर इमारत बांधकाम दरम्यान दोन लहान मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल आहे .
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे निकटवर्तीय महेंद्र कोठारी हे भाजपाशी संबंधित मानले जातात . महेंद्र आणि कविता कोठारी यांच्या मीरारोडच्या रामदेव पार्क - कनकिया भागातील के.डी. हर्मिटेज ह्या इमारतीचे काम सुरु आहे . ७ जून रोजी रोजी राबीबुल केताबुल रहमान ( वय ३० वर्ष ) हा मजूर काम करत असताना सातव्या माळ्यावरुन लिफ्टच्या डक मध्ये पडून डोक्यास, हाता-पायास मार लागून त्याचा मृत्यू झाला होता . इमारत बांधकाम ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टीने हेल्मेट, सेप्टी बेल्ट आदी गरजेचे असताना ते नसल्याने पडून त्याचा मृत्यू झाला प्रकरणी मीरारोड पोलिसांनी हैरुल शेख ह्या ठेकेदारावर ९ जून रोजी गुन्हा दाखल केला.
माजी आमदार मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अपना घर फेस - ३ च्या इमारत बांधकाम दरम्यान ३ सप्टेंबर २०२२ रोजी जयंतो दास (वय ६ वर्ष ) व सुभो दास ( वय ४ वर्ष ) ह्या दोन लहान बालकांचा डोक्यावर लोखंडी अँगल पडून मृत्यू झाला होता . त्या गुन्ह्यात तत्कालीन काशीमीरा पोलिसांनी ठेकेदार म्हणून महेंद्र कोठारी वर गुन्हा दाखल केला होता . सदर प्रकल्पातच २४ मे २०२४ रोजी मयत डब्लू यादव ( वय २२ वर्ष ) ह्या कामगाराचा पडून पृत्यु झाल्या बद्दल देखील ठेकेदार वर गुन्हा दाखल केला गेला . त्या आधी मुकेश सिंह मार्को ( वय २६ वर्ष ) ह्याचा फेब्रुवारी २०२४ मध्ये अपना घर फेस ३ च्या निर्माणाधीन इमारतीतून पडून मृत्यू झाला होता . परंतु ह्या सलग गुन्ह्यात देखील पोलिसांनी विकासकास आरोपी केले नाहीच शिवाय ३०४ हे कलम देखील जाणीवपूर्वक लावले नाही असे आरोप पोलिसांवर झाले .
आता त्याच महेंद्र कोठारी यांच्या रामदेव पार्क येथील बांधकाम सुरु असलेल्या के.डी. हर्मिटेज इमारती वरून पडून आणखी एका मजुराचा मृत्यू झाला आहे . ह्यात देखील मीरारोड पोलिसांनी विकासकास आरोपी केले नाहीतच शिवाय सतत कामगारांच्या मृत्यूच्या घटना घडून देखील कलम ३०४ लावले नाही असा आरोप सामाजिक संस्थांनी केला असून पोलिसांना मजुरांच्या जीवाशी सोयरसुतक नसल्याची टीका त्यांनी केली आहे .