पोलिसांची नोटीस : परप्रांतीय फेरीवाल्यांना संरक्षण देण्याचा मनसेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:11 IST2017-11-07T00:11:41+5:302017-11-07T00:11:53+5:30
फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीकरीता मनसेचे ठाणे शहर

पोलिसांची नोटीस : परप्रांतीय फेरीवाल्यांना संरक्षण देण्याचा मनसेचा आरोप
ठाणे : फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीकरीता मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे एक कोटींच्या जामिनाची मागणी करणारी नोटीस नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी अभय सायगावकर यांनी सोमवारी बजावली. या नोटिशीला येत्या सात दिवसांत उत्तर देण्याची मुदत आहे. या नोटिशीबाबत मनसेतून तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. पोलीस अप्रत्यक्षपणे परप्रांतीय फेरीवाल्यांना पाठिंबा देत असल्याचे मत मनसेने व्यक्त केले.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर मनसेने जाधव यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल केला होता. याप्रकरणी ठाणेनगर आणि नौपाडा या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याने जाधव यांच्यासह सात जणांना या दोन्ही पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी त्यांची १५ हजार रुपयांच्या जामिनावर ठाणे न्यायालयाने सुटका केली.
दरम्यान, सायगावकर यांनी सोमवारी रात्री ही नोटीस बजावल्याने मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
‘‘ नौपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री ८ वाजता ही नोटीस बजावली असून सात दिवसांच्या आत त्याचे उत्तर देण्यास बजावले आहे. तुम्ही केलेल्या गैरवर्तनाबाबत एक कोटींची हमी का घेण्यात येऊ नये, अशी ही नोटीस आहे. ठाणे न्यायालयाने मात्र दहा हजारांचा जामीन मंजूर केला आहे. मग अचानक ठाणे पोलिसांनी एक कोटींच्या जामिनाची मागणी कशी केली? आम्ही हा जामीन देणार नाही. इतकी आर्थिक क्षमता असणारी व्यक्ती आणणार कोठून?’’
-अविनाश जाधव, अध्यक्ष, ठाणे शहर, मनसे.
.....................................
‘‘ ठाणे पोलिसांचे डोके ठिकाणावर आहे का? एक कोटींचा जामीन मागून फेरीवाल्यांविरुद्ध मनसे आंदोलन करणार नाही, असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी गैरसमजुतीतून बाहेर पडावे. स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी मनसे वचनबद्ध आहे. पुन्हा जर ते स्टेशनवर बसले तर आम्ही त्यांना पुन्हा फटकवल्याशिवाय राहणार नाही.’’
-अभिजित पानसे, उपाध्यक्ष, मनसे