चोरट्याच्या मदतीने पोलिसांकडूनच लूट
By Admin | Updated: April 23, 2017 04:02 IST2017-04-23T04:02:01+5:302017-04-23T04:02:01+5:30
पश्चिमेतील कासारहाट भागातील सोनार कारागिरीचे काम करणाऱ्या उत्तम मायती याने चोरीचा माल घेतला असल्याचे सांगून बाजारपेठ पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले.

चोरट्याच्या मदतीने पोलिसांकडूनच लूट
कल्याण : पश्चिमेतील कासारहाट भागातील सोनार कारागिरीचे काम करणाऱ्या उत्तम मायती याने चोरीचा माल घेतला असल्याचे सांगून बाजारपेठ पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. त्याला नग्न करून जबर मारहाण केली. त्यानंतर, सोडण्याच्या बदल्यात ६० ग्रॅम सोने घेतले. हाच प्रकार अन्य दोन सोनारांसोबत घडल्याने बाजारपेठ पोलिसांनी एका चोरट्याच्या मदतीने सोनारांची लूट केल्याचा आरोप केला आहे. मात्र, सोनारांच्या आरोपाचा पोलिसांनी इन्कार केला आहे. सोनारांनी चोरीचे सोने घेतले होते. तेव्हा, चोरीच्या प्रकरणातील आरोपीने त्यांचेच नाव घेतले असल्याचा खुलासा बाजारपेठ पोलिसांनी केला आहे.
अत्यंत छोट्या जागेत मायती काम करतात. तेथे गुरुवारी पोलीस अधिकारी आले. त्यांनी सोबत एका चोरट्याला बेड्या घालून आणले होते. ‘कोण आहे तो?’ असा सवाल पोलिसांनी त्याला करताच ‘हाच तो उत्तम’, असे उत्तर त्याने दिले. त्यावर, ‘काय झाले, मी काय केले?’ अशी विचारणा उत्तमने पोलिसांकडे केली. ‘पोलीस ठाण्यात चल, तेथे गेल्यावर पुढचे बोलू’, अशी दमबाजी करत त्यांनी उत्तमला पोलीस ठाण्यात नेले. तेथे मारहाण केली. सोडण्याच्या बदल्यात पोलिसांनी उत्तमकडे दंड मागितला. गुन्हा नसताना उत्तमला सोडण्याच्या बदल्यात त्याच्या मित्रांकडून ६० ग्रॅम सोने घेतले. त्याची किंमत १ लाख ७० इतकी होते.
सपन बेरा यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. गुरुवारी सायंकाळी बेरा यांनाही पोलिसांनी उचलून नेले. त्याच चोरट्याला त्यांच्याकडे नेले. पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण केली. त्यांना सोडण्यासाठी ७० ग्रॅम सोने घेतले. चोरटा संजयही कारागिरीचे काम करायचा. पोलीस त्याचा वापर करून त्रास देत आहे, असा सोनारांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)
आमच्या तपासाचा भाग
बाजारपेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी म्हणाले की, एका घरफोडी प्रकरणात आरोपीला पकडले आहे. त्याने सोने कोणाला विकले, त्यांची नावे घेतली. तपासासाठी त्याला घेऊन पोलीस संबंधित सोनारांकडे गेले होते. त्याने सोनारांना ओळखल्याने त्यांना चौकशीसाठी आणले. त्यांच्याकडून घेतलेले सोने हे चोरीच्या प्रकरणातील आहे. त्यामुळे सोनारांचा आरोप बिनबुडाचा आहे. हा आमच्या तपासाचा भाग आहे. कोणताही सोनार त्याने चोरीचा माल घेतला आहे, असे स्वत:हून पोलिसांना सांगतो का. चोरट्याच्या आधारेच त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागते. तेच या प्रकरणात घडले आहे.