पोलिसांच्या जॅमरची चोरी
By Admin | Updated: May 25, 2016 04:29 IST2016-05-25T04:29:18+5:302016-05-25T04:29:18+5:30
नौपाड्यात ‘नो पार्किंग’ क्षेत्रामध्ये अगोदर आपली मोटार उभी करायची... वाहतूक पोलिसांशी टायरला बसवलेला जॅमर काढण्यावरून हुज्जत घालायची... पोलिसांची पाठ वळताच गाडीला लावलेले

पोलिसांच्या जॅमरची चोरी
ठाणे : नौपाड्यात ‘नो पार्किंग’ क्षेत्रामध्ये अगोदर आपली मोटार उभी करायची... वाहतूक पोलिसांशी टायरला बसवलेला जॅमर काढण्यावरून हुज्जत घालायची... पोलिसांची पाठ वळताच गाडीला लावलेले जॅमर टायरसहित काढून दुसरे टायर बसवून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उर्मट मोटारचालकाविरोधात पोलिसांनीचोरी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना शाखाप्रमुखाने महिला वाहतूक पोलिसाबरोबर असभ्य वर्तन करण्याचे प्रकरण अलीकडेच गाजले असताना ही ताजी घटना घडली आहे.
नौपाड्यातील संभाजी मार्गावर ‘एन्जॉय फॅशन’ या दुकानासमोर वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार अनिल शिंदे यांनी नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका ‘आयटेन’ कारला २१ मे रोजी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास जॅमर लावले. त्यामुळे मोटारीचा चालक बन्सल हा ‘जॅमर क्यों लगाया’, असा जाब विचारत पोलिसांच्या अंगावर धावून आला. या ठिकाणी ‘नो पार्किंग’चा फलक नसल्याबद्दल त्याने पोलीस निरीक्षक ए.एस. मांगले यांच्याशी हुज्जत घातली.
दंडाची रक्कम भरल्यावरच जॅमर काढण्यात येईल, असे मांगले यांनी त्याला बजावले. वाहतूक पोलीस अन्यत्र जाताच बन्सलने जॅमर लावलेले चाक काढून गाडीच्या डिकीत ठेवून त्या ठिकाणी दुसरे चाक लावले. पोलिसांची नजर चुकवून पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानाच पुन्हा तिथे आलेल्या शिंदेंना त्याने आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेने शिवीगाळ, धक्काबुक्की केली. पोलिसांच्या अंगावर गाडी घालून निघून जाण्याचाही त्याने प्रयत्न केला. मात्र, त्याची गाडी मांगले यांनी बिट मार्शलच्या मदतीने रोखल्यानंतर तो कार लॉक करून तिथून निघून गेला.
त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी जॅमर चोरणे, हल्ला करणे, शिवीगाळ करणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची मोटार नौपाडा पोलिसांनी जप्त केली असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलीस आणि प्रवाशांतील संघर्षाचे प्रमाण वाढले आहे. उपनिरीक्षक श्रीकांत पवार तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
अंगावर घातले वाहन...
विशेष म्हणजे जॅमर लावलेला टायर बदलून हा चालक पळ काढत असल्याचे पाहिल्यावर वाहतूक पोलीस तातडीने आले. त्या वेळी त्याने वाहतूक पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर, हा चालक चक्क आपली मोटार लॉक करून पसार झाला.
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
बन्सल याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी जॅमर चोरणे, हल्ला करणे, शिवीगाळ करणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.