पोलिसांनी साजरा केला ज्येष्ठांसोबत `आनंद`; प्रवीण दवणे यांचे झाले व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 02:04 IST2021-03-22T02:04:08+5:302021-03-22T02:04:18+5:30
संयुक्त राष्ट्राच्या वतीने २० मार्च हा `आनंद दिन` म्हणून साजरा केला जातो.

पोलिसांनी साजरा केला ज्येष्ठांसोबत `आनंद`; प्रवीण दवणे यांचे झाले व्याख्यान
मीरा रोड : मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलिसांसाठी आयुक्त सदानंद दाते यांनी आनंद दिनाचे औचित्य साधून गीतकार प्रवीण दवणे यांचा `आनंदी राहणे व आनंदाने कर्तव्य पार पाडणे` या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी काही नागरिकांना त्यांचा चोरीला गेलेला ऐवज परत करून त्यांच्या चेहऱ्यावर पोलिसांनी आनंद फुलवला.
संयुक्त राष्ट्राच्या वतीने २० मार्च हा `आनंद दिन` म्हणून साजरा केला जातो. पोलिसांना कामाच्या ताणतणावातून आनंदाचे क्षण मिळावेत, आनंदी कसे राहावे याचे मार्गदर्शन मिळावे त्या हेतूने पोलीस आयुक्त दाते व अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित केला होता.
पोलीस अधिकारी, अंमलदार आदींनी प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन सहभागी होऊन दवणे यांचे मार्गदर्शन ऐकले. दवणे यांनी पोलिसांना व्यस्ततेतून छंद जोपासण्याचा व सकारात्मक विचार करण्याचा कानमंत्र दिला. चोरीला गेलेला व पोलिसांनी तपासात मिळविलेला ५ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज नागरिकांना परत करण्यात आला. चोरीला गेलेला मुद्देमाल मिळाल्याने आनंद दिनी नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.