हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : बोईसरमधील अनिल कुमार आरेकर यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून त्यांच्या खात्यातून तीन कोटी ५६ लाख ६० हजार विविध बँक खात्यात ट्रान्सफर करून त्यांची लूट करणाऱ्या आरोपीचे कनेक्शन गुजरात व्हाया दुबई व्हाया कंबोडियापर्यंत पोहोचले आहे. पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या टीमने ८ आरोपींच्या मुसक्या आवळून पोलिस के हाथ लंबे होते है, याचा प्रत्यय दाखविला.
बोईसर येथील तक्रारदार आरेकर यांनी पत्नी आणि स्वतःच्या सेवानिवृत्तीच्या पैशांच्या ठेवी जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये ठेवल्या होत्या. १८ डिसेंबरला एका व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवर कॉल करून अंधेरी पोलिस ठाणे येथून बोलत आहे. तुमचा मोबाइल नंबर बेकायदेशीर जाहिराती आणि छळ केल्याच्या प्रकारात दोषी आढळल्याने तुमच्या खात्यातील पैशांची रिझर्व्ह बँक व सीबीआयमार्फत चौकशी करायची आहे, असे सांगत तुमच्या खात्यातील सर्व पैसे रिझर्व्ह बँकेतील खात्यात ट्रान्सफर करण्यात सांगितले.
घाबरलेल्या आरेकर यांनी आरोपीने पाठविलेल्या खात्यात ३ कोटी ५६ लाख ६० हजार रुपये जमा केले. यावेळी खात्यातील रक्कम ट्रान्सफर करताना बँकेतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना असे करू नका, पोलिसांकडे जा असा सल्ला दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. बोईसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष पवार, सायबर पोलिस निरीक्षक अजय गोरड, उपनिरीक्षक रूपाली गुंड, टीमने समांतर तपास करून कारवाई करत आठ जणांना अटक केली.
आरोपींना नागपूर, गुजरात, बिहारमधून केली अटकपोलिसांनी नागपूर येथून सैफ रिजवान अहमद अन्सारी (वय २६), फैज रिजवान अहमद अन्सारी (२५), झोएब अहमद अन्सारी (२०) आणि गुणवंत मते (३३) यांना प्रथम ताब्यात घेतले. त्यानंतर गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथून झकरिया झोया (२५), शोएब शहा (२९), रिझवान मलिक (३४) याला अटक केली. त्यानंतर अन्य एक आरोपी बाबर सिराज खान (३०) याला बिहार राज्यातील बंतारा गावातून अटक केली. या सर्व आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असून पालघर पोलिस सीबीआय आणि इंटरपोल पोलिसांची मदत घेणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.