अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांचा पोलिसांवर हल्ला
By Admin | Updated: February 10, 2017 04:13 IST2017-02-10T04:13:02+5:302017-02-10T04:13:02+5:30
अंबरनाथ रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांची दादागिरी वाढलेली असून त्याचा प्रत्यय नागरिकांसोबत आता पोलिसांनाही आला आहे.

अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांचा पोलिसांवर हल्ला
अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांची दादागिरी वाढलेली असून त्याचा प्रत्यय नागरिकांसोबत आता पोलिसांनाही आला आहे. मुजोर फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांवरच या फेरीवाल्यांनी हल्ला करत कारवाईला विरोध केला. पोलिसांवरच हल्ला झाल्याने याप्रकरणी सात फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सहा आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा वावर वाढला असून त्या ठिकाणी फेरीवाले नागरिकांवर दादागिरी करतात. पालिका प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलालाही हे फेरीवाले जुमानत नसल्याचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. याचा प्रत्यय सुरक्षा दलाला गुरुवारी आला. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान पादचारी पुलावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेले असता सर्व फेरीवाल्यांनी एकत्रित येऊन या कारवाईला विरोध केला. पुलावर प्रवाशांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहत नसल्याच्या अनेक तक्रारी रेल्वेकडे येत असल्याने रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी सुभाष ठाकूर यांनी पूल मोकळा करण्याचे आदेश दिले.
फेरीवाल्यांनीही संघटित होऊन या कारवाईला विरोध करण्याचे निश्चित केले. पोलीस जसे कारवाईसाठी पुलावर आले, त्याचवेळी सर्व फेरीवाल्यांनी त्यांना घेराव घालत कारवाईला विरोध केला. काही फेरीवाल्यांनी आपल्या फळाची टोपली उलटून पोलिसांवर आरोप करण्यास सुरुवात केली.
या कारवाईला विरोध करण्यासाठी महिला पुढे सरसावल्याने पोलिसांनाही नमते घेण्याची वेळ आली. आपल्या कर्मचाऱ्यांना रोखण्याचे प्रयत्न होत असल्याचे अधिकारी ठाकूर यांना कळताच त्यांनी कडक कारवाई करण्याच्या हेतूने मोबाइलवर सर्व विरोध करणाऱ्या फेरीवाल्यांचे चित्रीकरण करत पुलापर्यंत आले. त्याचवेळी पोलीस आणि फेरीवाल्यांची वादावादी सुरू असताना एका महिलाविक्रेतीने ठाकूर यांच्या दिशेने फळ फेकून मारले.
अधिकाऱ्यासोबत हा प्रकार घडल्याने पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेत या फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई करत संपूर्ण पूल मोकळा केला. पुलावरून पळालेले हे फेरीवाले पालिका हद्दीतील स्कायवॉकवर जाऊन बसले, तर काही फेरीवाल्यांनी थेट पुलाशेजारील जागेवर आपले ठाण मांडले.
सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील संजीव यादव, सोहिल जाधव, जितेंद्र छेदीलाल, विकास यादव, कल्लू यादव, धर्मू यादव या सहा जणांना अटक केली, तर अखिलेश यादव हा फेरीवाला फरार झाला आहे. (प्रतिनिधी)