संमेलन स्मरणिकेत काव्य, समीक्षेवर भर
By Admin | Updated: December 28, 2016 03:32 IST2016-12-28T03:32:19+5:302016-12-28T03:32:19+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेची तयारी सुरू झाली असून, त्यामध्ये काव्य, समीक्षा, भाषा संस्कृती या विषयांवरील लेखनाला प्राधान्य दिले जाणार आहे.

संमेलन स्मरणिकेत काव्य, समीक्षेवर भर
- जान्हवी मोर्ये, डोंबिवली
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेची तयारी सुरू झाली असून, त्यामध्ये काव्य, समीक्षा, भाषा संस्कृती या विषयांवरील लेखनाला प्राधान्य दिले जाणार आहे.
स्मरणिकेचे संपादकीय मंडळ व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची एक बैठक अलीकडेच पार पडली. या बैठकीत स्मरणिकेवर चर्चा करण्यात आली आहे. संमेलन एका महिन्यावर येऊन ठेपले असल्याने स्मरणिका लवकरात लवकर तयार करून ती छापून संमेलनात तिचे प्रकाशन करण्याच्या दृष्टीने काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. संमेलन स्मरणिका ही स्मरणात राहावी. तसेच ती अत्यंत वाचनीय व एक उच्चतम साहित्यमूल्य असावे या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन स्मरणिका तयार केली जाणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे हे ज्येष्ठ समीक्षक असल्याने स्मरणिकेत काव्य व समीक्षेवरही अधिक भर दिला जाणार आहे.
यासंदर्भातील बैठकीला महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, महामंडळाच्या सदस्या उषा तांबे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सुरेश देशपांडे आदी उपस्थित होते. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, संत साहित्य यावर प्रकाश टाकणारे लेखन असेल. बोली आगरी भाषा, तिचा इतिहास याचा समावेश केला जाणार आहे. भाषेच्या जाणकारांकडून विवेचन करणारे लेखन त्यात असणार आहे. आगरी बोलीची नजाकत, तिच्यातील बारकावे, तिचे सादरीकरण कसे असेल यावर प्रकाश टाकला जाईल. आगरी समाजाविषयी गैरसमज दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. आगरी समाजाची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संमेलनाध्यक्ष व स्वागताध्यक्ष यांचे परिचय त्यात असणार आहेत. स्मरणिकेत एकूण १२ ते १३ लेख असणार आहेत.