ठाण्यात प्लायवूड आणि केकच्या दुकानाच्या आगीमध्ये लाखोंचे नुकसान
By जितेंद्र कालेकर | Updated: May 5, 2023 19:17 IST2023-05-05T19:16:48+5:302023-05-05T19:17:00+5:30
घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील प्लायवूड आणि केक शॉप या बाजूबाजूच्या दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

ठाण्यात प्लायवूड आणि केकच्या दुकानाच्या आगीमध्ये लाखोंचे नुकसान
ठाणे : घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील प्लायवूड आणि केक शॉप या बाजूबाजूच्या दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रण आली. मात्र, आगीमध्ये दोन्ही दुकाने जळून खाक झाली. या आगीने क्षणात रौद्र धारण केल्याने धुराचे लोळ मोठया प्रमाणात पसरले होते. वेहीच आग नियंत्रणात आल्यामुळे दुकानाच्या शेजारी असलेल्या एका खासगी रुग्णालयामधील रुग्णांना तिथून हलविले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या दरम्यान, खबरदारी म्हणून रुग्णांना रुग्णालयातुन खाली आणले होते. त्यामुळे त्यांचे हाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घोडबंदर रोडवरील मानपाडा ब्रीजजवळील साई किरण रेस्टॉरंट आणि बार समोरील जिनेश जैन यांच्या ला प्लायवूड शॉप तसेच मिलिंद चौहान यांच्या सूफले केक शॉपच्या दुकानांना आग लागून भीषण स्वरूप धारण केल्याची माहिती मिळाल्यानंतर कापूरबावडी अग्निशमन दलासह ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच चितळसर पोलिस ठाण्याचे पथक, महावितरण विभागांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी कापूरबावडी अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी दोन फायर, दोन वॉटर टँकर, दोन जंबो वॉटर टँकर आणि एका टी.टी.एल. मशीनची मदत घेण्यात आली. ही दुकाने बाजूबाजूला असून मुख्य रस्त्याच्या सर्व्हिस रोडला असल्याने याचा परिणाम वाहतुकीवरही झाला होता. आग पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी करून ती मोबाईलमध्ये कैद करताना बरीच मंडळी आघाडीवर होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून दोन्ही दुकानांचे मात्र मोठया प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
कचराही पेटला
मानपाडा, निळकंठ वूड या ठिकाणी कचºयाला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास लागली. घटनास्थळी कचºयाला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने नियंत्रणात आणली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.