नाटक असं असतं राजांनो...

By Admin | Updated: January 25, 2017 04:56 IST2017-01-25T04:56:44+5:302017-01-25T04:56:44+5:30

पाठ्यपुस्तकांत लेखकांचा परिचय, त्यांनी लिहिलेल्या नाटकांची नावं वाचली होती. पण हे नाटक काय असतं, ते कसं करतात हे कधीच पाहिलेलं नव्हतं.

Plays like Rajan ... | नाटक असं असतं राजांनो...

नाटक असं असतं राजांनो...

प्रज्ञा म्हात्रे / ठाणे
पाठ्यपुस्तकांत लेखकांचा परिचय, त्यांनी लिहिलेल्या नाटकांची नावं वाचली होती. पण हे नाटक काय असतं, ते कसं करतात हे कधीच पाहिलेलं नव्हतं. यापूर्वी कधीही ठाण्यात पाऊल ठेवलेलं नाही. नाटक पाहण्याच्या निमित्तानं ठाण्यात पाऊल ठेवलं आणि गडकरी रंगायतनची पायरी चढलो. हे केवळ आम्ही शिक्षकांचा पिच्छा पुरवला आणि शिक्षकांनी नेटानं आपचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवल्यानं शक्य झालं, अशा भावना मोखाडा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
खोडाळा या दुर्गम भागातून विभाग हायस्कूलचे इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी नाटक पाहण्याकरिता पहिल्यांदाच ठाण्यात आले होते. सोमवारी त्यांनी ‘आईचं पत्र हरवलं’ हे नाटक पाहिलं. ठाण्यातील झगमगाट पहिल्यांदाच पाहिलेले ही मुले शहराविषयी भरभरुन बोलत होती. मोठमोठ्या इमारती, गाड्या, सुंदर कपडे घातलेली टी.व्ही.वर दिसतात तशी माणसं या विषयी त्यांना कुतूहल वाटत होते. शहरातील प्रत्येक गोष्टं ते आपल्या डोळ््यांत साठवत होते. ठाण्यातलं काय आवडलं, असं विचारल्यावर त्यांनी शहरांतील आवडलेल्या गोष्टींचा पाढाच वाचला. आमच्या गावी नाट्यगृह नाही पण ग्रामदेवतेची यात्रा असली की सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमात आम्ही भाग घेतो. नाटकाविषयी शाळेत ऐकले तेव्हा त्यात काम करण्याची फार इच्छा झाली. पण ते नेमके असते कसे हेच आम्हाला माहीत नाही. म्हणूनच आम्ही शिक्षकांकडे नाटक पाहण्याचा आग्रह धरला. नाटकांची नावं वर्तमानपत्रात वाचली होती.
आपल्या खोडाळाबद्दल मुले सांगू लागली. गावात तासनतास लोडशेडिंग, पाणीटंचाई आहे. निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य रेशन दुकानांवर मिळते. गहू तर हातात घ्यावेसे वाटत नाहीत. त्यापासून बनवलेल्या काळ््या पोळ््या खातो. पाच दिवसांनी गावात पाणी येते आणि तेही तेलकट. त्यामुळे सर्दी, खोकला यांसारख्या आजाराला सतत सामोरे जावे लागते. खोडाळ््यात बंधारा आहे. पण त्यात गाळ भरल्यानं पाण्याचा वापर करता येत नाही. आमच्याकडे शौचालये नाहीत. उघड्यावर जावे लागते, अशी खंत विद्यार्थिनींनी व्यक्त केली.
खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा हाच प्रश्न पडतो. गावात कुपोषण आणि बालविवाह या दोन मोठ्या समस्या आहेत. कुपोषणाबाबत असलेल्या शासनाच्या योजना घरोघरी पोहोचलेल्या नाहीत. दर महिन्याला घरोघरी कुपोषणामुळे मृत्यू होतात. मुलगी १५ वर्षांची झाली की, लग्न लावली जातात. माझ्या मैत्रिणीचे असेच कमी वयात लग्न लावले. तिला लग्न करायचे नव्हते. तिची शिकण्याची इच्छा होती. पण घरच्यांच्या दबावामुळे तिने लग्न केले. तिच्या घरच्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आम्हाला दम दिला. मुलींनी जास्त शिकून करायचे आहे काय, असा प्रश्न वडीलधाऱ्यांनी केला. गावात शिक्षणाची सोय नाही. तीन शाळा आहेत. त्या मोडकळीस आल्या आहेत. आमची शिक्षणाची खूप इच्छा आहे पण आम्ही शिकावं हे ना घरच्यांना वाटतं ना शासनाला, अशी खंत या विद्यार्थिनींनी बोलून दाखवली.

Web Title: Plays like Rajan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.