वाहतुकीसाठी हवे नियोजन

By Admin | Updated: March 11, 2017 02:39 IST2017-03-11T02:39:22+5:302017-03-11T02:39:22+5:30

रस्ते रूंद केले तरी रहदारीला शिस्त आणि नियोजन नसल्याने ठाण्यातील वाहतुकीचा प्रश्न जटील बनला आहे. त्यातही टीएमटीच्या बस वाढवून उपयोग नाही, तर एकंदरीतच

Planning for transportation | वाहतुकीसाठी हवे नियोजन

वाहतुकीसाठी हवे नियोजन

ठाणे : रस्ते रूंद केले तरी रहदारीला शिस्त आणि नियोजन नसल्याने ठाण्यातील वाहतुकीचा प्रश्न जटील बनला आहे. त्यातही टीएमटीच्या बस वाढवून उपयोग नाही, तर एकंदरीतच या सेवेचा अभ्यास होण्याची गरज आहे, असे मत ट्रान्स्पोर्ट रिसर्च अ‍ॅण्ड कन्सल्टन्सी क्षेत्रातील तज्ज्ञ प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले.
त्रासदायक रस्ते वाहतुक, वाहतुक कोंडी आणि परिवहन- टीएमटी या ठाणेकरांच्या समस्या आजही कायम आहेत. रस्ते वाढले तरी समस्या सुटलेल्या नाहीत. नियोजनाचा अभाव असल्यानेच रस्ते वाढवूनही अनेक भागात वाहतुक कोंडी आहे. उड्डाणपुलांचे नियोजन चुकल्याने त्याचा फटका मोठ्या जंक्शनच्या ठिकाणी वाहतुक कोंडीतून बसतो. परिवहन सेवेत कितीही बस
त्रवाढवल्या, तरी समस्या सुटत नाही, कारण शहरातील मार्गांचा अभ्यासच व्यवस्थित झालेला नाही. परिणामी, ठाणेकरांना सुखकर प्रवासाची हमी मिळू शकत नाही. त्यामुळे नियोजनावर भर दिला आणि विकास आराखड्याची व्यवस्थित आणि वेळेत अंमलबजावणी केली, तर या समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्याची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात गेली आहे. शहर वाढतेय, परंतु त्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. वाहतुक कोंडीचाच विचार केला, तर ठाण्यात आजच्या घडीला दरवर्षी वाहनांच्या संख्येत आठ ते १० टक्के वाढ होते. ही कोंडी केवळ वाहनांच्या वाढणाऱ्या संख्येमुळेच होते, असे म्हणून चालणार नाही. त्याला इतर कारणेही जबाबदार आहेत. रस्त्यांचे नियोजन योग्यप्रकारे झालेले नाही, पार्किंगच्या पुरेशा सोयी नाहीत, कुठेही कशापध्दतीने वाहने पार्क करणे, याचे योग्य नियोजन होणे गरजेचे असल्याचे मला वाटते.
कॅडबरीसारख्या जंक्शनवर एकाच वेळेस १६ रस्ते एकत्रत येऊन मिळतात. परंतु तेथे वाहतुक पोलीस अवघे तीन ते चार असतात. त्यातही सिग्नल सुटण्यापूर्वीच वाहतूक पोलीसही वाहनांना जाण्यास परवानगी देतात. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे वाहन चालकांबरोबर वाहतूक पोलिसांनाही शिस्त लागणे महत्वाचे आहे. रस्ते वाढत आहेत, परंतु ते ठाण्याबाहेर. शहराच्या मध्यवर्ती ठाण्यात रस्ते वाढण्यासाठी जागाच नाही, काही रस्ते गॅरेजवाल्यांनी तर काही फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. त्यामुळेही वाहतुक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही पालिकेने कारवाई करणे अपेक्षित आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
आपण एकीकडे स्मार्ट सिटीकडे जाण्याची तयारी करीत असतांना दुसरीकडे रस्त्यावरील वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असतो. मागील काही महिन्यात रस्ता रुंदीकरण झाले, पोखरण १, २ असो अथवा स्टेशन परिसर असो, अशा अनेक रस्त्यांचे रुंदीकरण झाले अथवा होऊ घातले आहे. परंतु केवळ रस्ते रुंद करुन भागणार नाही.
रुंदीकरणानंतर त्या रस्त्यांचे नियोजन, बससाठी वेगळी लेन, सायकलसाठी वेगळी लेन किंबहुना पादचाऱ्यांसाठीही वेगळी लेन असणे अपेक्षित आहे. यामुळे वाहतुक
सुरळीत तर होईलच; शिवाय कोंडीही टाळण्यास मदत होणार आहे. परंतु पादचाऱ्यांना लेन दिल्यावर तेथे फेरीवाले अतिक्रमण करणार द्य
नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल, अशी सूचना पाटील यांनी केली. (प्रतिनिधी)

झेब्रा क्रॉसिंग ओलांडले की दंड
एखाद्या जंक्शनवर एखादा वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगची लेन ओलांडून त्यापुढे किंवा त्यावर वाहन उभे करीत असले तर त्याच्यावर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. किंबहुना मी तर असे म्हणेन की त्याठिकाणी एक लाल रेषच मारावी आणि ती ओलांडली तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट लिहावे, तेव्हा कुठे वाहनचालकांना शिस्त लागेल. स्मार्ट सिटी अंतर्गत जे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत, त्याचा फायदा अशा जंक्शनच्या ठिकाणी होईल. दंडाच्या रकमेतही वाढ करावी, असे त्यांनी सुचवले.

आधीच्या मार्गांचा अभ्यास करा
परिवहन किंवा टीएमटीबाबत खूप काही बोलता येईल. परंतु कितीही बस वाढविल्या, तरी जर नियोजनाचाच अभाव असेल तर तुम्हाला योग्य सेवा देणे शक्यच होणार नाही. त्यामुळे नवीन बस घेतांना कोणत्या मार्गावर वर्दळ अधिक आहे, कोणत्या मार्गावर किती वेळाने बस सोडणे गरजेचे आहे, कमी वर्दळीचे मार्ग कोणते, याचा अभ्यास आधीच होणे गरजेचे आहे.
परंतु तसे होतांना दिसत नाही. याशिवाय प्रत्येक बसथांब्याच्या ठिकाणी बसेस उभ्या करण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच बस उभ्या राहतील, याची काळजी घ्यावी.
कर्मचाऱ्यांना शिस्त, आगारातून बसेस वेळेत सुटतील याची काळजी घेणे, कार्यशाळेत तज्ज्ञ मंडळींची नेमणूक करणे गरजेचे आहे, देखभाल दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद होणे अपेक्षित असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: Planning for transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.