अंबरनाथमध्ये सामाजिक विषयांवरील चित्ररथांना दाद
By Admin | Updated: March 29, 2017 05:39 IST2017-03-29T05:39:57+5:302017-03-29T05:39:57+5:30
पारंपारिक वेशातील महिला आणि पुरूष, सोबत विविध सामाजिक विषयावरील आकर्षक चित्ररथ, महिलांची बाईकरॅली

अंबरनाथमध्ये सामाजिक विषयांवरील चित्ररथांना दाद
अंबरनाथ : पारंपारिक वेशातील महिला आणि पुरूष, सोबत विविध सामाजिक विषयावरील आकर्षक चित्ररथ, महिलांची बाईकरॅली आणि ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत करण्याकरिता रस्त्यावर उतरलेली तरुणाई यामुळे स्वागतयात्रेचा उत्साह यंदाही अनुभवास आला.
वडवली येथील ब्राह्मण सभेला यंदाच्या यात्रेचे यजमानपद मिळाले होते. श्री गजानन महाराज सेवा मंडळाच्या सहचिटणीस संध्या म्हात्रे, सुयोग महिला मंडळाच्या अध्यक्षा अनिता डिक्रूस, माधुरी आठवले, उज्ज्वला कबरे, पूर्णिमा जावळे यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या उपस्थितीत महिलांच्या बाईक रॅलीला शिवाजी चौकातून प्रारंभ झाला. नऊवारी साड्या परिधान करून बाईक रॅलीमध्ये महिला सहभागी झाल्या होत्या. खेर विभागातील हेरंब मंदिरात उपयात्रा सहभागी झाल्यानंतर यात्रेला सरुवात झाली. धार्मिक तसेच शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे चित्ररथ यात सहभागी झाले. ‘पाणी वाचवा’, ‘बेटी बचाओ’, ‘निसर्गाचे संतुलन राखा’, अशा सामाजिक विषयावर चित्ररथ तयार केले. शिवाजी चौकात आ. डॉ. बालाजी किणीकर , नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी स्वागतयात्रा समितीच्यावतीने छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून यात्रा हुतात्मा चौकाकडे गेली. (प्रतिनिधी)
बदलापूरमध्ये ढोल-ताशांच्या गजरात पारंपारिक सोहळा
महिलांच्या ढोल पथकांचा गजर, जोडीला ध्वजपथकांची साथ, शंखनाद, त्याला लहानमुलांच्या लेझीमची जोड, पैठणीतील महिला बाईकस्वार, विविध विषयांवरील सामाजिक संदेश देणारे चित्ररथ यामुळे बदलापूरच्या स्वागतयात्रेतही उत्साहाचे वातावरण होते.
नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि हनुमान मारूती देवस्थान यांच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. बदलापूर पश्चिमेकडील दत्त चौकतून ही शोभायात्रा निघाली. ही स्वागतयात्रा गणेशचौक, मोहनानंद नगरमार्गे रेल्वे स्थानक परिसरात पोहोचली.
कात्रप आणि शिरगावमधून येणाऱ्या उपयात्रा मुख्य यात्रेत सहभागी झाल्या. यावेळी शिरगावच्या ‘मर्दानी’या महिलांच्या ढोलपथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच पथकातील तलवार पथक, ध्वजपथक आणि गुढी घेतलेल्या पथकांचे संचलन
हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले.
बदलापूरच्या ‘मार्तंड’ ढोलपथकानेही यात्रेची शोभा वाढवली. ‘इंधन वाचवा’ हा संदेश देणारे साईश्याम देवस्थान येथील चित्ररथाने सगळ््यांचे लक्ष वेधून घेतले. सत्कर्म बालकाश्रमही यात्रेत सहभागी झाला होता.