निवडणुकीतून ‘पीरिपा’ची माघार

By Admin | Updated: February 7, 2017 04:06 IST2017-02-07T04:06:05+5:302017-02-07T04:06:05+5:30

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने शिवसेनेला सोमवारी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. ‘पीरिपा’च्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसवर सापत्न

'Peripa' retreat from election | निवडणुकीतून ‘पीरिपा’ची माघार

निवडणुकीतून ‘पीरिपा’ची माघार

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने शिवसेनेला सोमवारी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. ‘पीरिपा’च्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसवर सापत्न वागणुकीचे आरोप केले असून उल्हासनगरात मात्र स्वबळावर लढण्याची घोषणा या वेळी केली.
प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिकेच्या निवडणुकीस एकत्रितरीत्या सामोरे जाण्याची घोषणा केली.
केवळ विकासाच्या मुद्यावर आपल्या पक्षाने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असल्याचे ‘पीरिपा’चे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले यांनी स्पष्ट केले. पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्याशी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. त्यानुसार, हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस ‘पीरिपा’चा मित्रपक्ष आहे. परंतु, ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आम्हाला अजिबात विश्वासात घेतले
नाही. पक्षाला दुय्यम वागणूक दिली. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. उल्हासनगरातही हीच स्थिती आहे. उल्हासनगरात ‘पीरिपा’च्या प्रत्येक उमेदवारासमोर काँग्रेसने त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
ठाण्यात पक्षाचे पाचही उमेदवार माघार घेऊन सेनेसाठी काम करतील. उल्हासनगरात ‘पीरिपा’चे तीन उमेदवार असून चार उमेदवार पीरिपा पुरस्कृत आहेत. तेथील निवडणूक स्वबळावर लढवली जाईल, असे टाले यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस ‘पीरिपा’चे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंता जगताप, ठाणे शहराध्यक्ष महेंद्र पवार, ठाणे प्रभारी स्वप्नील जाधव, शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Peripa' retreat from election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.