पेंढरकर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण
By Admin | Updated: February 14, 2017 02:45 IST2017-02-14T02:45:09+5:302017-02-14T02:45:09+5:30
के. व्ही. पेंढरकर कॉलेजचे प्रशासन व व्यवस्थापनाकडून मनमानी सुरू आहे. त्याचा त्रास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहन करावा

पेंढरकर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण
डोंबिवली : के. व्ही. पेंढरकर कॉलेजचे प्रशासन व व्यवस्थापनाकडून मनमानी सुरू आहे. त्याचा त्रास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे व्यवस्थापन मंडळ बरखास्त करावे, या मागणीसाठी सोमवारपासून राजर्षी शाहू महाराज शिक्षक-शिक्षकेतर संघटनेने साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेचे पदाधिकारी चिमणलाल पराठे हे कॉलेजनजीक उपोषणाला बसले आहेत. दररोज एक जण, याप्रमाणे संघटनेचे ३५ सदस्य उपोषणाला बसणार आहेत. कॉलेजचा कारभार विद्यापीठाच्या नियमावलीनुसार चालत नाही. त्यात मोठ्या प्रमाणात अनागोंदी आहे. शिक्षक व शिक्षकेतरांना त्याचा त्रास होतो. याप्रकरणी संघटनेने राज्यपाल, संचालक आणि पोलीस आणि विद्यापीठाकडे तक्रार केली आहे. विद्यापीठाकडून चौकशी झाली आहे. विद्यापीठाने व्यवस्थापन मंडळ बरखास्त करावे, असा शेरा मारला आहे. त्याची अंमलबजवणी केली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेचे जवळपास पन्नासपेक्षा जास्त सभासद याप्रकरणी लढा देत आहेत. त्याला दाद मिळत नसल्याने हे उपोषण छेडण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिलीप मेढे, सचिव सुवर्णा दांडकर उपस्थित होते.
साखळी उपोषणाबाबत कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई म्हणाले की, संघटनेच्या सदस्यांना उपोषणाला बसण्याचा अधिकार नाही. कॉलेज प्रशासन व व्यवस्थापनाकडून कोणावरही अन्याय झालेला नाही. मंडळ बरखास्त करण्याची मागणी म्हणजे मालकाला बरखास्त करण्याची मागणी आहे.
या संघटनेतील प्रमुख दोन व्यक्ती या महाविद्यालयात प्राचार्य आणि क्लार्कपदावर कामावर होते. त्यांना महाविद्यालयातून बडतर्फ केले आहे. त्यामुळे आता ते आमचे कर्मचारी नाहीत. त्याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. खालच्या न्यायालयात व्यवस्थापनाच्या बाजूने निकाल लागलेला आहे. या युनियनच्या पूर्वीच्या कर्मचाऱ्यांविरोधात उच्च न्यायलयात गेलो असल्याने ते न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करीत आहेत. त्यांची मागणीच मुळात बेकायदा आहे.
(प्रतिनिधी)