पीक आणेवारी ५० पैशांवर
By Admin | Updated: October 3, 2015 03:22 IST2015-10-03T03:22:52+5:302015-10-03T03:22:52+5:30
राज्याच्या अनेक भागांत दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. त्या तुलनेत मागील वर्षापेक्षा ठाणे जिल्ह्यात सुमारे ४६०६ मिमी पाऊस कमी पडल्याने त्याचा फटका धरणांतील पाणीसाठ्याला बसला आहे.

पीक आणेवारी ५० पैशांवर
सुरेश लोखंडे, ठाणे
राज्याच्या अनेक भागांत दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. त्या तुलनेत मागील वर्षापेक्षा ठाणे जिल्ह्यात सुमारे ४६०६ मिमी पाऊस कमी पडल्याने त्याचा फटका धरणांतील पाणीसाठ्याला बसला आहे. सुदैवाने भातपिकाची स्थिती चांगली असल्यामुळे पीक आणेवारी ५० पैशांच्यावर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कृषी क्षेत्रातील काही जाणकारांचा कानोसा घेतला असता जिल्ह्णातील पीकस्थिती बऱ्यापैकी असून उत्पादनात काहीअंशी घट होण्याची शक्यता असली तरी पीक आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी राहणार नसल्याचा अंदाज आहे. महसूल विभागाने मागील महिन्यात पीक आणेवारीच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याची गती पाहता लवकर अहवाल मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी लोकमतने यासंदर्भातील कानोसा घेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा नाजूक विषय असल्यामुळे नाव न छापण्याच्या अटीवर काही जणांनी पीक आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी राहणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला.
जिल्ह्यातील ६७ हजार हेक्टरवर खरिपाचे पीक घेतले जाते. पण, पावसाने दडी मारल्यामुळे त्याची लागवड काहीअंशी उशिराने झाली. सुमारे ९१ टक्के म्हणजे सुमारे ५९ हजार १५० हेक्टरवर भाताची लागवड पूर्ण करता आली. तीन हजार हेक्टरवर नागली, वरी या पिकांची आणि चार हजार हेक्टरवर कडधान्याची पेरणी झाली आहे. परंतु, भात ऐन पोटरीसह ओंब्या बाहेर येण्याच्या महत्त्वाच्या कालावधीत पावसाने आणखी दांडी मारली आहे.