संततधार पावसामुळे रस्त्यांना खड्डे; वाहनचालक त्रस्त
By Admin | Updated: July 17, 2014 01:16 IST2014-07-17T01:16:14+5:302014-07-17T01:16:14+5:30
गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पनवेल शहरासह ग्रामीण भागाला बसला असून अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत

संततधार पावसामुळे रस्त्यांना खड्डे; वाहनचालक त्रस्त
पनवेल : गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पनवेल शहरासह ग्रामीण भागाला बसला असून अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी मोठमोठे वृक्षसुध्दा उन्मळून पडले आहेत. तर सखल भागात पाणी साठल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत.
संततधार पावसामुळे शहरातील ठाणानाका परिसर, तालुका पोलीस स्टेशन, सरस्वती विद्यामंदिरासमोरील परिसर, टपालनाका, सोसायटी आदी भागात पाणी साठण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचप्रमाणे ठाणानाका मार्ग, टपालनाका येथील शनिमंदिरासमोर, त्याचप्रमाणे इतर भागातसुध्दा अनेक रस्त्यांना या पावसात खड्डे पडल्याने वाहन चालवणे त्रासदायक होत आहे. त्याचबरोबर कित्येक ठिकाणचे वृक्ष उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्र्रकारसुध्दा वारंवार घडत आहेत. ग्रामीण भागातसुध्दा हीच अवस्था असून मोठ्या प्रमाणात रस्त्यांना खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. गाडेश्वर धरण, कासाडी नदी, पाताळगंगा नदी, पांडवकडा धबधबा पाण्याने भरुन वाहत आहेत. यामुळे पर्यटकसुध्दा या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. ग्रामीण भागता बळीराजा लावणी, आवटणीच्या कामाला जुंपला असून मजूर मिळत नसल्याने आदिवासी वाड्यातील मजूरांना घेऊन शेतीची कामे करुन घ्यावी लागत आहेत. एकंदरीत समाधानकारक पाऊस पडत असल्याने सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (वार्ताहर)