`दरोडखोरी`मुळे खासगी रुग्णालयांकडे रुग्णांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:41+5:302021-04-04T04:41:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या पहिल्या लाटेत खासगी रुग्णालयांनी केलेल्या लुटमारीच्या सुरस व चमत्कारिक कथा सर्वश्रुत असल्याने कोरोनाच्या ...

`दरोडखोरी`मुळे खासगी रुग्णालयांकडे रुग्णांची पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या पहिल्या लाटेत खासगी रुग्णालयांनी केलेल्या लुटमारीच्या सुरस व चमत्कारिक कथा सर्वश्रुत असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांचा खासगी रुग्णालयांची पायरी न चढण्याकडे कल आहे. कल्याण-डोंबिवली शहरांत दररोज नवे हजारेक रुग्ण आढळत असून बहुतांश रुग्णांना महापालिकेच्या कोविड रुग्णालयात उपचार घ्यायचे असल्याने तेथे रुग्णांची तुफान गर्दी झाली आहे तर खासगी कोविड रुग्णालयात २११ बेड चक्क रिक्त आहेत. महापालिका रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांच्या नातलगांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असतानाही रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल होण्यास तयार नाहीत.
महापालिका हद्दीत काही खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांनी बेडची चौकशी केली असता त्यांना बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. मंत्रालयात कार्यरत असलेले आणि कल्याणमध्ये राहणारे कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नीलाही कोरोना झाला आहे. त्यांनी बेडची विचारणा केली असता त्यांना खासगी रुग्णालयात दुपारपर्यंत बेड उपलब्ध झालेला नव्हता. त्यांनी महापालिकेच्या आरोग्य खात्याशी संपर्क साधला असता आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी होलिक्रॉस, आयुष आणि अन्य एका खासगी रुग्णालयात चौकशी केली असता त्याठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी अन्य काही खासगी रुग्णालयांत २११ बेड शिल्लक आहेत. खासगी रुग्णालयात बेड शिल्लक असताना रुग्णांचा सरकारी कोविड रुग्णालयात प्रवेश मिळावा याकडे अधिक कल दिसून येतो. कारण सरकारी रुग्णालयात उपचार मोफत मिळतात तर खासगी रुग्णालये बिलाकरिता मानेवर सुरा फिरवतात, असे रुग्णांच्या नातलगांचे म्हणणे आहे. मागच्या वर्षी कोविड काळात खासगी रुग्णालयांनी बिलापोटी रुग्णांची लूट केली होती. खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट करू नये याकरिता महापालिकेने पुन्हा खासगी रुग्णालयात ऑडिटर्सची नियुक्त्या केली आहे. सरकारी नियमानुसार बिल आकारले जात आहे की नाही याची दाद मागण्यासाठी हे ऑडिटर्स नेमले असल्याने नागरिकांनी भरमसाठ बिलाची भीती मनातून काढून टाकावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महापालिका हद्दीत आजमितीस ४० खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचार करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. एखाद्या रुग्णालयाने परवानगी मागितल्यास त्याच दिवशी परवानगी दिली जात आहे. खासगी रुग्णालयातील एकूण बेडपैकी ८० टक्के बेड हे कोविड रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत.
--------------
चौकट-केडीएमसी कोविड रुग्णालये
उपलब्ध एकूण बेड-३ हजार ४०१
रिक्त बेड-२६६
ऑक्सिजन एकूण बेड- १ हजार ९३९
रिक्त बेड-६७७
आयसीयू एकूण बेड-८४९
रिक्त बेड-१३१
व्हेंटिलेटर एकूण बेड-२५७
रिक्त बेड-२०६
--------------
चौकट-खासगी कोविड रुग्णालये
उपलब्ध एकूण बेड-१ हजार २४९
रिक्त बेड-२११
ऑक्सिजन बेड-६२८
रिक्त बेड-३१७
आयसीयू एकूण बेड-२९७
रिक्त बेड-४३
व्हेंटिलेटर एकूण बेड-९४
रिक्त बेड-४३
---------------