डोंबिवलीतही मिळणार पासपोर्ट
By Admin | Updated: June 28, 2017 03:22 IST2017-06-28T03:22:44+5:302017-06-28T03:22:44+5:30
पासपोर्टसाठी ठाण्यापर्यंत धाव घेणाऱ्या कल्याण-डोंबिवलीकरांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे,

डोंबिवलीतही मिळणार पासपोर्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पासपोर्टसाठी ठाण्यापर्यंत धाव घेणाऱ्या कल्याण-डोंबिवलीकरांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी १८ एप्रिलला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्याला स्वराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या २२ लाखांच्या पुढे आहे. या मतदारसंघात तीन महापालिका, एक नगरपालिका आणि ७५ हून अधिक गावे आहेत, असे शिंदे यांनी स्वराज यांच्या निदर्शनास आणले. त्यानुसार डोंबिवलीत सेवा केंद्र उघडण्याचा निर्णय स्वराज यांनी घेतल्याचे पत्र मिळाल्याचे शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर अशा केवळ चार ठिकाणीच पासपोर्ट कार्यालये आहेत. ठाण्याअंतर्गत मुंबई वगळता एमएमआर प्रदेश, नवी मुंबई, रायगड तसेच उत्तर महाराष्ट्र इतका मोठा परिसर येतो. त्यामुळे ठाणे कार्यालयावर कामाचा मोठा ताण आहे. ठाणे कार्यालयाअंतर्गत सध्या केवळ तीनच पासपोर्ट सेवा केंद्रे आहेत. त्यापैकी एकच ठाण्यात, तर एक मुंबईला आणि एक नाशिक येथे आहे. त्यामुळे ठाण्याच्या पुढील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर येथील हजारो नागरिकांची गैरसोय होते. या निर्णयामुळे ही गैरसोय टळणार आहे.