केडीएमटीच्या बसमध्ये प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू
By Admin | Updated: June 1, 2017 04:47 IST2017-06-01T04:47:33+5:302017-06-01T04:47:33+5:30
केडीएमटीच्या पनवेल-कल्याण बसमध्ये प्रवासादरम्यान मंगळवारी गणेश तुकाराम गुडेकर या प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

केडीएमटीच्या बसमध्ये प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमटीच्या पनवेल-कल्याण बसमध्ये प्रवासादरम्यान मंगळवारी गणेश तुकाराम गुडेकर या प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. केडीएमटीची बस कल्याणला आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे तत्काळ ही बस थेट रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे नेण्यात आली. परंतु, डॉक्टरांनी गुडेकर यांना तपासून ते मृत झाल्याचे घोषित केले.
गुडेकर मंगळवारी सकाळी कामावर गेले होते. मात्र, छातीत दुखायला लागल्याने कल्याणला घरी परतण्यासाठी त्यांनी नावडाफाटा येथे केडीएमटीची बस पकडली. बस शेवटच्या थांब्यावर पोहोचली असता गुडेकर बसमध्ये निपचित पडले होते. ही बाब चालक व वाहकांच्या निदर्शनास आली. त्यांनी मार्गतपासणीस श्याम पष्टे यांना याबाबतची माहिती दिली. पष्टे यांनी तत्काळ ही बस रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे नेण्यास सांगितले.