‘त्या’ बॅगेमुळे प्रवाशांच्या काळजाचे पाणी; ठाणे रेल्वेस्थानकात ‘पळापळ’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 07:02 AM2022-12-05T07:02:49+5:302022-12-05T07:03:03+5:30

श्वानांद्वारे केली तपासणी, ही माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे एक अधिकारी आणि आठ कर्मचारी हे स्नुफी श्वानासह तातडीने दाखल झाले

Passengers worry because of unknown bag; Alert at Thane railway station | ‘त्या’ बॅगेमुळे प्रवाशांच्या काळजाचे पाणी; ठाणे रेल्वेस्थानकात ‘पळापळ’

‘त्या’ बॅगेमुळे प्रवाशांच्या काळजाचे पाणी; ठाणे रेल्वेस्थानकात ‘पळापळ’

googlenewsNext

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी फलाट  क्रमांक १० वर दोन संशयितांकडे सापडलेला खाेका आणि काळ्या रंगाच्या बॅगेमुळे प्रवाशांची पाचावर धारण बसली. बाॅम्बशाेधक पथक दाखल हाेताच प्रवाशांच्या चेहऱ्यावरील भीतीची रेषा आणखीनच गडद झाली. 

काही कळण्याच्या आतच प्रवाशांनी सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी धडपड सुरू केली. सर्व परिसर निर्मनुष्य करून बाॅम्बशाेधक पथकाने तपासणी केली असता संशयित खाेक्यात जुने कपडे आणि बॅगेत वायरीसह सुतळचे बंडल सापडले आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. ही माेहीम फत्ते हाेताच हे रेल्वे पाेलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे माॅकड्रिल असल्याचे रेल्वे पाेलिसांनी स्पष्ट केले.

रेल्वे स्थानकात २६-११ सारखी एखादी घटना घडलीच तर ठाणे रेल्वे पोलिसांसह सुरक्षा दल, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक-नाशक या यंत्रणांचा कसा प्रतिसाद मिळतो, याची चाचपणी करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी रविवारी ठाण्यात मॉकड्रिल घेतले होते. फलाट क्रमांक दहा-ए वर दोन प्रवाशांकडे संशयास्पद खाेका आणि बॅग असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलासह सर्व यंत्रणांना दिली. 

ही माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे एक अधिकारी आणि आठ कर्मचारी हे स्नुफी श्वानासह तातडीने दाखल झाले. त्यापाठोपाठ रेल्वे पोलीस मुख्यालयातील श्वान हिरासह पथकही घटनास्थळी हजर झाले. दोन वेगवेगळया पथकांनी मुंबईच्या दिशेकडील नवीन ब्रिजखालील जागा निर्मनुष्य केली. स्रुुफी आणि हिरा या श्वानांनी बॅग आणि खाेक्याची तपासणी केली. सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता केलेल्या या मॉकड्रिलमुळे प्रवाशांत चांगलीच घबराट पसरली होती. 

कोणत्या यंत्रणांचा सहभाग?
रेल्वे सुरक्षा दलासह ठाणे रेल्वे पोलिस, कोपरी पोलिस, डोंबिवली, कल्याण आणि कुर्ला रेल्वे पोलिसांचे तसेच अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही यावेळी सहभागी झाले होते. अशी घटना घडली तर काेणती आणि काय खबरदारी घेतली जावी, याचे मार्गदर्शनही रेल्वेचे  वरिष्ठ पाेलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी केले.

Web Title: Passengers worry because of unknown bag; Alert at Thane railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.