एसी लोकलच्या विरोधात बदलापुरात प्रवाशांनी व्यक्त केला संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2022 22:08 IST2022-08-22T22:08:04+5:302022-08-22T22:08:16+5:30
आधीच मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या 66 फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र वातानुकूलित लोकलचं तिकिट अधिक असल्याने प्रवाशांनी एसी लोकलकडे पाठच फिरवली आहे.

एसी लोकलच्या विरोधात बदलापुरात प्रवाशांनी व्यक्त केला संताप
बदलापूर: एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनस होऊन सायंकाळी 5.22 ला सुटणारी बदलापूर लोकल ही एसी करण्यात आल्याने अनेक प्रवाशांना त्या पाठीमागून येणाऱ्या खोपोली ट्रेनमधून प्रवास करावा लागत आहे. या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने आज बदलापूरातील प्रवाशांनी सायंकाळी खोपोली ट्रेनमध्ये उतरून बदलापूर रेल्वे स्थानकातील स्थानक प्रबंधकांना घेराव घातला. काही काळ याठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर प्रवाशांची मागणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितल्यावर प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
रेल्वे प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरु करण्यात आल्या. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एसी लोकलची संख्याही वाढवली जाणार आहे. आधीच मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या 66 फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र वातानुकूलित लोकलचं तिकिट अधिक असल्याने प्रवाशांनी एसी लोकलकडे पाठच फिरवली आहे. इतकंच नाही तर एसी लोकलविरोधात प्रवाशांचा रोषही वाढत चालला आहे. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांची नाराजी ओढवून घेतली आहे. याचाच प्रत्यय आज मध्य रेल्वेवरच्या बदलापूर रेल्वे स्थानकावर पाहिला मिळाला. सामान्य लोकल रद्द करुन एसी लोकल चालवण्याने प्रवाशांचा उद्रेक झाला. संतापलेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घातला. ऐन गर्दीच्यावेळी सामान्य लोकल रद्द केल्याने प्रवासी चांगलेच भडकले. आज सायंकाळी खोपोलीत लोकलने उतरलेल्या बदलापूर आतील प्रवाशांनी थेट स्टेशन मास्तर यांचे कार्यालय घाटात आपली नाराजी आणि आपला संताप व्यक्त केला. अखेर स्थानक प्रबंधक कानी या संतप्त प्रवाशांना त्यांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे आश्वासन दिल्यावर प्रवाशांनी हे आंदोलन मागे घेतले