वॉर्डमधील स्लॅबचा भाग कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 22:55 IST2019-11-19T22:55:44+5:302019-11-19T22:55:47+5:30
जिल्हा शासकीय रुग्णालयातील घटना; कोणीही जखमी नाही, प्रशासनाचा दावा

वॉर्डमधील स्लॅबचा भाग कोसळला
ठाणे : ठाणे जिल्हा (सामान्य) शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील वॉर्ड क्रमांक ५ मधील छताच्या स्लॅबचा काही भाग पडल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सुदैवाने हा भाग पडला तेंव्हा त्या परिसरात कोणी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ज्या टेबलावर तो पडला त्यामुळे त्या टेबलवरील काचेसह एक ट्युबलाईट फुटली असून पंख्याच्या पात्याही वाकल्या आहेत.
रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या तळ मजल्यावर वॉर्ड क्रमांक पाच आहे. या वॉर्डतील कामकाज साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते. त्यामुळे या वॉर्डमध्ये नेहमीच वर्दळ सुरू असते. सकाळी कर्मचारी येण्यास सुरुवात झाली होती. मात्र,जेंव्हा स्लॅबचा काही भाग पडला तेंव्हा आलेला एक कर्मचारी काही कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यानंतर ९ वाजून ३५ मिनिटांनी स्लॅबचा काही भाग अचानक टेबलावरच पडला. त्याने जोरात आवाज होऊन त्याचे तुकडे सर्वत्र उडाले. अचानक पडलेल्या त्या भागामुळे टेबलवरील काच फुटली. तसेच ज्या ठिकाणचा भाग पडला तेथील ट्युबलाईट ही जोरात पडल्याने आवाज झाला. तसेच तेथे असलेल्या पंख्याच्या पात्या वाकल्या ंआहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून लवकरच येथून रुग्णालय स्थंलातरीत करावे, अशी कुजबुज आता कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. या मजल्यावर प्रसूती वॉर्ड असून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांची केबिन आहे. तसेच ज्या वॉर्डच्या स्लॅबचा काही भाग पडला त्याच्यावरच जिल्हा शल्यचिकित्सकांचीही केबिन आहे.
रुग्णालयाच्या एका वॉर्डमधील स्लॅबचा काही भाग पडल्याच्या वृत्तास दुजोरा देऊन, कोणीही या घटनेमध्ये जखमी झाले नाही. रुग्णालय स्थलांतराचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ते स्थलांतरित होईल.
- डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे