भातसा नदीवरील पुलाचा भाग कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:30 IST2020-08-29T00:30:07+5:302020-08-29T00:30:14+5:30
ग्रामस्थ वैभव कडव म्हणाले की, वालकस व बेहरे गावातील नागरिक या पुलाचा वापर करतात. हा पूल ५० वर्षे जुना असून, यापूर्वी त्याची तीन वेळा पडझड झाली आहे.

भातसा नदीवरील पुलाचा भाग कोसळला
कल्याण : पावसामुळे खडवलीनजीक वालकस-बेहरे गावाकडे जाणाऱ्या भातसा नदीवरील जुन्या पुलाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे जीवघेणे झाले आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामस्थ वैभव कडव म्हणाले की, वालकस व बेहरे गावातील नागरिक या पुलाचा वापर करतात. हा पूल ५० वर्षे जुना असून, यापूर्वी त्याची तीन वेळा पडझड झाली आहे. आतापर्यंत त्याची डागडुजी करण्यात आली, मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही. यंदाही पावसामुळे पुलाचा काही भाग कोसळला आहे. पूल कमी उंचीचा आहे. पुलाचा भाग कोसळल्याने त्यावरून ग्रामस्थ जीव मुठीत धरून येजा करत आहेत. भविष्यात संपूर्ण पूल नदीच्या पात्रात कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. पुलाबरोबर वालकस व बेहरे गावाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ताही तातडीने तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घालून रस्ता व पुलाची दुरुस्ती करावी, याकडे लक्ष वेधले आहे.