गावदेवी मैदानाखाली होणार पार्किंग प्लाझा
By Admin | Updated: August 14, 2015 23:44 IST2015-08-14T23:44:06+5:302015-08-14T23:44:06+5:30
ठाणे महापालिकेने एकीकडे पार्किंग धोरण राबविण्यास सुरुवात केली असताना आता शहरातील आरक्षित भूखंडावर पार्किंग सेंटर सुरू करण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे.

गावदेवी मैदानाखाली होणार पार्किंग प्लाझा
ठाणे : ठाणे महापालिकेने एकीकडे पार्किंग धोरण राबविण्यास सुरुवात केली असताना आता शहरातील आरक्षित भूखंडावर पार्किंग सेंटर सुरू करण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे. तसेच आता स्टेशन परिसरात असलेल्या गावदेवी मैदानाखाली पार्किंग प्लाझा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, अखेर यासंदर्भातील प्रस्ताव २० आॅगस्टच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात रोज सुमारे सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करीत असतात. पैकी, बहुसंख्य प्रवासी हे स्वत:च्या मालकीच्या वाहनांचा वापर करीत असून स्थानक परिसरात वाहन पार्किंग करतात. तसेच रेल्वे स्थानक परिसरास लागून असलेली बाजारपेठ पाहता परिसरात सतत वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या ठिकाणी पुरेशा पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक वेळा रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची पार्किंग होत असते. त्यामुळे या भागात वाहतूककोंडीही होत आहे. त्यामुळेच यावर पर्याय म्हणून पालिकेने तीन वर्षांपूर्वी गावदेवी मैदानाखाली पार्किंग प्लाझा उभारण्याचा विचार सुरू केला होता. मात्र, प्रत्यक्षात मुहूर्त सापडला नव्हता. परंतु, आता या भागात होणारी वाहतूककोंडी पाहता पालिकेने पुन्हा हा प्रस्ताव पटलावर आणला आहे.
गावदेवी मैदानाच्या सुमारे ७७५० चौ.मी. क्षेत्रफळापैकी सुमारे ५६५२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भागात तळघरात वाहनतळ विकसित करण्याचे पालिकेने प्रस्तावित केले आहे. यामध्ये सुमारे १५० चारचाकी हलकी वाहने आणि १४० दुचाकी वाहने एकाच वेळी पार्क करता येऊ शकणार आहेत. या वाहनतळाची भविष्यात क्षमता वाढविता येईल, अशा प्रकारचेही नियोजित बांधकाम करण्यात येणार आहे. या वाहनतळात अद्ययावत सोयीसुविधांयुक्त पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीमबरोबरच अग्निशमन यंत्रणा तसेच सुरक्षेविषयी यंत्रणा (सीसीटीव्ही कॅमेरे) बसविण्यात येणार आहेत. या कामासाठी २७ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित धरला आहे. यामध्ये स्थापत्य कामाकरिता येणाऱ्या खर्चासह तज्ज्ञ सल्लागार फी, पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा तसेच सुरक्षेविषयी यंत्रणेचा समावेश असणार आहे. (प्रतिनिधी)