आई-बाबा स्वत:साठी अन् आमच्यासाठी मास्क वापरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 00:46 IST2021-02-28T00:46:24+5:302021-02-28T00:46:35+5:30
विद्यार्थ्यांचे भावनिक आवाहन : कामानिमित्त घराबाहेर पडतात पालक

आई-बाबा स्वत:साठी अन् आमच्यासाठी मास्क वापरा !
स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आई मास्क घेतला का? बाबा आधी हात धुवा, थांबा तुम्ही बाहेरून आलात ना, सॅनिटायझर लावा, अशी वाक्ये हल्ली अनेक घराघरांत ऐकायला मिळताहेत आणि तीही लहान मुलांच्या ताेंडून. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या झाल्या आणि गेल्या वर्षभराच्या काळात याचे महत्त्व लहान मुलांना अधिक समजलेले दिसते.
कोरोनाने आपल्या दैनंदिन सवयी, आपल्या जगण्यात अनेक महत्त्वाचे बदल झाले. मास्क घालणे किंवा ताेंडावर स्वच्छ धुतलेला रुमाल लावणे अनिवार्य झाले. तो नाही घातला तर त्रास होतोच, मात्र आता दंडही बसतो. तसेच वारंवार हाताला सॅनिटायझर लावणे या बाबी अंगवळणी पडल्या. मुलांना या सगळ्याचे सुरुवातीला कुतूहल होते.
मात्र, हल्ली घरोघरीच्या लहानग्यांकडून आपल्या पालकांना, बाहेरून येणाऱ्या अन्य नातेवाइकांना याबाबत सूचना केल्या जातात. ही मुले मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता या सर्वच बाबतीत जागरूक झालेली दिसत आहेत. स्वत:च्या आणि आपल्या आईवडिलांची काळजी त्यांच्या या जागरूकतेमध्ये दिसून येते.
स्वत:ची काळजी घ्या आणि आईबाबाचीही काळजी घ्या !
nप्रथम तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तसेच आई-वडील, भाऊ-बहिण, शेजाऱ्यांचीही काळजी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसलीच तर त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे.
nआई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेर जाताना ते मास्क लावतात का? बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतले का? सॅनिटायझर वापरले का, हेदेखील पाहा, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रातून शालेय विद्यार्थ्यांना दिला आहे.
मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे याबाबतच जास्त जागृती झालेली दिसते. आणि ते फक्त पालकांनाच सांगत नाहीत, तर ते स्वत:ही त्याचा योग्यरीतीने अवलंब करतात. आपण मोठी माणसे मास्क हनुवटीवर किंवा मानेवर लटकवत ठेवतो. मात्र मुले मास्कने नाक आणि तोंड झाकून ठेवतात. त्यांना ऑनलाइन शाळांतही याबाबत जागरूक केले जाते. हातपाय स्वच्छ धुणे, खाण्यापूर्वी सॅनिटायझर लावणे या त्यांना चांगल्या सवयी जडल्या आहेत.
- डॉ. संतोष कदम, अध्यक्ष, आयएमए, ठाणे
बाबा ऑफिसला जातात, तर आई कधी तरीच पण बाजारात किंवा कामासाठी जाते. ते दोघंही मास्क लावता.; पण बाहेरून आल्यावर कधी खूप दमलेले असल्याने कंटाळा करत हातपाय स्वच्छ धुवायला मात्र विसरतात, मग मी किंवा मोठी दीदी आम्ही त्यांना त्याची आठवण करून देतो, पण तेही आमचं लगेच
ऐकतात.
- दुर्वेश केमनाईक
माझे आईबाबा दोघंही नोकरीसाठी आणि मोठा भाऊ क्लाससाठी घराबाहेर जातो. मीही कधी त्यांच्यासोबत जाते. मास्क लाव असे मला ते सगळे ओरडून सांगतात; मात्र स्वत: कधी कधी मास्क खाली करून ठेवतात. मग मीच त्यांना ओरडून मास्क लावायला सांगते. तर बाहेर काही खाताना आधी सॅनिटायझर लावण्याची आठवण करते.
- साक्षी सुरसे
कोरोनामुळे बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावायला हवा. माझी आई रोज ऑफिसला जाताना मी तिला आठवण करून देते. आई मास्क घे म्हणून आणि बाहेरून घरात येणाऱ्यांच्या हातावर सॅनिटायझरही देते. मला काही जण हसतात; पण बाहेरून घरात आल्यावर आम्ही पण आधी हातपाय धुतो आणि आईबाबांना पण सांगतो.
- रामेश्वरी टेटविलकर