पालघर - ठाण्यामध्ये आज लोकन्यायालय
By Admin | Updated: February 11, 2017 03:36 IST2017-02-11T03:36:49+5:302017-02-11T03:36:49+5:30
ठाणे जिल्हा सत्र त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यायातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार , सहकार न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकन्यायालय ११ फेब्रुवारीला पार पडणार आहे.

पालघर - ठाण्यामध्ये आज लोकन्यायालय
ठाणे : ठाणे जिल्हा सत्र त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यायातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार , सहकार न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकन्यायालय ११ फेब्रुवारीला पार पडणार आहे. येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०.३० वाजता या राष्ट्रीय लोकन्यायालयास प्रारंभ होणार आहे.
सर्व पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी या राष्ट्रीय लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकन्यायालयात दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक स्वरूपाची, १३८ एनआय कायद्यासंबंधीची (धनादेश वगैरे), मोटार अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, वीज व पाणीदेयके इत्यादी प्रकरणे या लोकन्यायालयात तडजोडीसाठी ठेवून निकाली काढली जाणार आहेत.
बहुतेक सर्व प्रकारच्या दिवाणी प्रकरणांत लोकन्यायालयांमध्ये तडजोड करता येते. न्यायालयांमध्ये आपली प्रकरणे प्रलंबित असल्यास ती लोकन्यायालयासमोर ठेवून सामंजस्याने वाद सोडवावा. विशेषत: मोटार अपघात, धनादेश न वटणे, या प्रकरणांत झटपट निकाल मिळतो, असे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.एन. खेर यांनी स्पष्ट करून या लोकन्यायालयात न्यायासाठी प्रकरणे ठेवण्याचे आवाहन त्यांनी पक्षकारांना केले आहे. (प्रतिनिधी)