पालघर जिल्ह्यात हाहाकार, बाजार ठप्प !

By Admin | Updated: November 10, 2016 02:56 IST2016-11-10T02:56:50+5:302016-11-10T02:56:50+5:30

पाचशे व हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द झाल्याचा परिणाम वसई येथील ग्रामीण भागातील जीवनावश्यक वस्तूच्या देवाण घेवाणीवर परिणाम झाला होता.

Palghar district strike, market jam! | पालघर जिल्ह्यात हाहाकार, बाजार ठप्प !

पालघर जिल्ह्यात हाहाकार, बाजार ठप्प !

पाचशे व हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द झाल्याचा परिणाम वसई येथील ग्रामीण भागातील जीवनावश्यक वस्तूच्या देवाण घेवाणीवर परिणाम झाला होता.
चलन म्हणून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारत नव्हते. यामुळे अनेक नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित राहावे लागले. खिशात पैसे असूनही रिकाम्या हाताने नागरिकांवर घरी परतण्याची वेळ आली. शहरी भागामध्ये प्रचलित डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांचा वापर होत असल्याने आॅनलाईन व्यवहार होत असले तरी ग्रामीण भागामध्ये बहुतेक नागरिकांना आॅनलाइनची माहिती नाही व काहींना असली तरी त्या भागात त्याची सुविधा असलेले मॉल वा तत्सम दुकाने नसल्याने त्यांचे हाल झाले. रिक्षा, टाटा मॅजीक व इतर खाजगी वाहनांनी प्रवास करताना वाहन चालक या नोटा स्वीकारत नसल्याने बराच गोंधळ उडून बाचाबाचीचे प्रकारही घडले. एस टी मध्ये सुट्टे पैसे देण्याघेण्या वरून वाहक बरोबर हुज्जत घालण्याचे प्रकारही घडले. यामुळे नागरिकांनी प्रवास करण्यापेक्षा घरीच राहणे पसंत केले. तर गावागावात रोज लागणाऱ्या दैनंदिन वस्तू, किराणा, भाजी, मच्छी आदी विक्रीकरणारे विक्रेते या नोटा स्वीकारत नव्हते. तर ठेकेदार यांच्याकडे काम करणारे कामगार, शेतमजूर हेसुद्धा या नोटा स्वीकारत नव्हते. यामुळे रोजंदारीच्या कामावरही परिणाम झाल्याचे दिसत होते.
महामार्गावरील खानिवडे टोल नाक्यावर टोल कर्मचारी व वाहन धारक यांचे सुट्ट्या पैशा वरून घडलेल्या सघार्षामुळे बरीच वाहने टोल न घेता सोडून देण्यात आली. तसेच पेट्रोल पंपावर सुटे पैसे नसल्याने ५०० किंवा १००० रुपयांचे पेट्रोल नाइलाजाने टाकावे लागत होते. मात्र मोदींच्या या निर्णयाचे ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वागत केले आहे . वसई विरार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजाचे शुल्क हे ५०,१०० च्या नोटा व चेक ड्रॉफ्ट च्या माध्यमातून जास्त प्रमाणात झाल्याची माहिती अधिकारी अभय देशपांडे यांनी दिली.


वसईतील व्यवहार ठप्प
वसईतील व्यवहार सकाळपासून ठप्प झाले होते. दुकाने ओस पडली होती. सोन्याला मागणी आहे पण बाजारपेठेतून सोनेही गायब झाले. महापालिकेने नोटा घेण्यास नकार दिल्याने कर वसुलीवर परिणाम झाला. हॉटेल मालक नोटा घेत नसल्याने शहरवासीयांचे नाश्ता आणि जेवणाचे वांधे झाले. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना मोठा फटका बसला.
नोटा व्यवहारातून बाद झाल्याची घोषणा झाल्यानंतर रात्री बारा वाजेर्पंत वसई विरार परिसरातील एटीएम सेंटरबाहेर लोकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळपासून मात्र सर्वसामान्य लोकांना अनेक धक्कादायक अनुभवांचा सामना करावा लागला. वसईकरांची सकाळ दुधवाल्याच्या नकार घंटेपासून सुुरु झाली. त्यांनी पाचशेच्या नोटा घेण्यास नकार देत पहिला धक्का दिला. त्यानंतर बुधवार असल्याने मासळी आणायला बाजारात गेलेल्या गृहिणींना मच्छीवालीने दुसरा धक्का दिला. बाजारात मासळी किमान शंभर रुपयांपासून सुरु होते. मासळी विक्रेत्या महिला पाचशे अथवा हजार रुपयांच्या नोटा घेत नव्हता. तर भाजी बाजारात फक्त शंभरची नोट असेल तरच गिऱ्हाईकांशी बोलले जात होते. अनेक पेट्रोल पंपावर रांगा होत्या. रेल्वे तिकीट खिडक्यांवर मोठ्या रांगा लागलेल्या दिसत होत. अनेकांनी सहा ते वर्षभराचे पास काढून नोटा वटवून घेण्याचे समाधान पदरात पाडून घेतले.
सोने खरेदी करणे अगदी सुलभ असल्याने बहुतेक लोकांनी सोने खरेदीसाठी धाव घेतली होती. मात्र, सोनारांकडे सोनेच नसल्याने सगळ्यांचा हिरमोड झाला. सोन्याला मागणी आहे. बाजारात दर ३० हजार पाचशे जाहिर करण्यात आला आहे. पण, सोन्याच्या मख्य बाजारपेठेतूनच सोने गायब झाले आहे. गिऱ्हाईक दर द्यायला तयार आहेत. बाजारात सोने मिळत नसल्याने सोने कोठून द्यायचे? आहे ते विकून आलेल्या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न पडल्याने सोनार अडचणीत सापडल्याची माहिती सुरेश सोनी या सोनाराने दिली.


सर्वसामान्यांना बसला जबरा फटका
पालघर : चलनातून ५०० व १००० रु पयांच्या नोटा काढून घेण्याच्या निर्णयाचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला.
चहावाल्याच्या टपरीपासून ते सोनारांच्या दुकानांपर्यंत याचा थेट परिणाम आज पाहावयास मिळाला. कोणीही ५०० व १००० ची नोट घ्यावयास तयार नव्हते त्यातच शहरातील सर्व बँकांसह ए टी एम हि बंद असल्यामुळे सर्वसामान्यांची गोची झाली.
सकाळी भाजी बाजारातही या नोटा कोणीही स्वीकारत नसल्यामुळे भाजीपाला खरेदीदार व विक्र ीदार यांना याचा मोठा फटका बसलाच पण यामुळे दुर्गम भागातून इथे आपली भाजी ठोक भावात विकणाऱ्यांनाही या निर्णयामुळे रिकाम्या हातीच परतावे लागले. परिणामी बाजारात विक्र ीसाठी आणलेल्या या भाज्या विकल्या व खरेदी न केल्यामुळे तशाच पडून राहिल्या तर काहींनी लगेच खराब होणाऱ्या भाज्या कचऱ्यात फेकून दिल्यात. बाजारपेठेत होणाऱ्या करोडो रुपयाची आर्थिक उलाढाल शून्यावर असल्यासारखी स्थिती पालघर मध्ये होती. या नोटा बँकेतच जमा करावे लागणे अनिवार्य असल्यामुळे कोणीही या नोटा स्वीकारत नव्हते. पालघरमधील बाजारपेठाप्रमाणे अवस्था सराफ बाजारांचीही झाली होती मोठी मोठी सराफ दुकाने आज रिकामी दिसत होती तर काहींनी आपली दुकाने बंदच ठेवली आज सोन्याचा भावही जाहीर झाला नसल्याले धंदा करायचा कसा हा प्रश्न सराफांपुढे तर भावाशिवाय सोने विकत घ्यायचे अथवा विकायचे कसे असा प्रश्न सराफांना पडला. त्यांनीही आपल्या दुकानात फक्त नवीन नोटा स्वीकारल्या जातील असे सूचना फलक लावले होते . निर्णयानुसार ५०० व १००० रु पयांच्या नोटा घेण्यास बंदी घातली तरी निकषांप्रमाणे निवडक ठिकाणी त्या स्वीकारल्या जात होत्या. पेट्रोल पंप, शासकीय रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, शासन पुरस्कृत ग्राहक संस्था, शासकीय दुग्ध विक्र ी केंद्रे, रेल्वे तिकिटे, एस टी सेवा पालघरमधील पेट्रोल पंपावर ५०० व १००० रु पयांच्या नोटा स्वीकारत होते व एकट्याने किंवा समूहाने तेवढ्या रकमेचे पेट्रोल सक्ती करीत होते. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सुट्टे पैसे द्यायचे तरी कसे हाच प्रश्न या पंप चालकांना पडला, हीच परिस्थिती रेल्वे तिकीट खिडक्यांकडेही पाहावयास
मिळाली. ५०० व १००० रु पयांच्या नोटा देऊन सुट्टे घेण्यासाठी लोकं १० ते १५२ मिनिटे थांबत असल्याचे चित्र आज पाहावयास मिळाले.
अचानक झालेल्या या निर्णयामुळे रातो रात सर्वचजण हडबडून गेल्याचे चित्र होते.

Web Title: Palghar district strike, market jam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.