Palghar Train Accident: जळगाव रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच पालघरमधूनही दुःखद बातमी समोर आली आहे. पालघरमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला एक्सप्रेस ट्रेनने तिला चिरडले. महत्त्वाची बाब म्हणजे या विद्यार्थिनीने कानात इअरफोन घालून ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी, विद्यार्थिनीला येणाऱ्या ट्रेनचा आवाज ऐकू न आल्यामुळे हा अपघात झाला असावा, असं म्हटलं आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
गुरुवारी पालघरमध्ये रेल्वे रुळ ओलांडत असताना १६ वर्षीय मुलीचा ट्रेनने धडकून मृत्यू झाला. दुपारी १:१० वाजता सफाळे आणि केळवे रोड रेल्वे स्थानकांदरम्यान ही भीषण घटना घडली. मुलीने हेडफोन घातले होते ज्यामुळे तिला ट्रेन येत असल्याचे ऐकू गेले नाही एक्स्प्रेसने तिला धडक दिली. माकणेजवळ उड्डाणपूल नसल्याने स्थानिकांना धोकादायक पद्धतीने रेल्वे ओलांडावी लागत आहे. अनेक विद्यार्थी आणि इतर प्रवासी रेल्वे ट्रॅक किंवा रस्त्यांवरून जाताना कानात इअरफोन लावतात. त्यांना येणाऱ्या गाड्या किंवा वाहनांचीही जाणीव होत नाही. या घटनेची चौकशी सुरू झाली असून रेल्वे पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.
पालघर जिल्ह्यातील माकणे गावातील वैष्णवी रावल रुळ ओलांडत असताना कोचुवेली-अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनने तिला धडक दिली. या धडकेमुळे तिलागंभीर दुखापत झाली. त्यामुळे वैष्णवीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने इअरफोन लावले असल्याने तिला येणाऱ्या ट्रेनचा आवाज ऐकू आला नसेल आणि हा अपघात घडला. या घटनेनंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आणि अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आग लागल्याच्या अफवेमुळे जळगावजवळ कर्नाटक एक्स्प्रेसने रेल्वे रुळावर थांबलेल्या प्रवाशांना चिरडले. या दुर्घटनेत १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. एकूण १३ मृतांपैकी किमान ८ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. तर कमीत कमी ५९ इतर लोक जखमी झाले, ज्यात १२ जणांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना व्हेंटिलेशन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.