पालघरमध्ये १०८ रुग्णवाहिका ठरली कोरोनाकाळात जीवनवाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:39 IST2020-12-14T00:39:53+5:302020-12-14T00:39:57+5:30
४ हजार ४०४ जणांना मिळाले जीवनदान; ११ रुग्णवाहिका धावल्या अविरत

पालघरमध्ये १०८ रुग्णवाहिका ठरली कोरोनाकाळात जीवनवाहिनी
- सुनील घरत
पारोळ : पालघर जिल्ह्यात कोरोना संकटकाळात कोरोनायोद्धा म्हणून डॉक्टर, परिचारिका, आशासेविका, पोलीस, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी आठ महिन्यांपासून कोरोनासोबत लढत आहेत, पण या सर्वांसोबत जीवनवाहिनी ठरली ती १०८ रुग्णवाहिका. तिने आजपर्यंत अविरतपणे सेवा दिली आहे. कोरोना रुग्ण, संशयित यांची ने-आण करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची सेवा पालघर जिल्ह्यात उपयुक्त ठरली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या काळात ११ रुग्णवाहिका धावल्या असून, त्यांनी ४ हजार ४०४ कोरोना रुग्णांना जीवनदान दिले. या काळात ६४ चालक व ४६ डॉक्टर यांनी आपले कर्तव्य चोख बजावले. कोरोना रुणांना सेवा देत असताना, दोन डॉक्टर व दोन चालक यांनाही कोरोनाची लागण झाली होती. पालघर जिल्हा हा सागरी, डोंगरी व नागरी भागात विभागला असून, वसई, विरार, नालासोपारा, पालघर, बोईसरसारखा शहरी भाग आहे, तसेच विक्रमगड, जव्हार, मोखाडासारख्या दुर्गम भागाचाही समावेश आहे.
कोरोनाने पाय पसरल्यापासून रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत
महाराष्ट्र सरकार आणि भारत विकास
समूहाच्या संयुक्त संघटनेतर्फे चालविल्या जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिका कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांसाठी जीवनवाहिनी म्हणून धावून आल्या आहेत. कोरोना विषाणूने जिल्ह्यात पाय पसरला, तेव्हापासून १०८ रुग्णवाहिका रुग्णांची सेवा करीत आहे.
१० हजारहून अधिक रुग्णांना लाभ
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संकटात '१०८' या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा तब्बल १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला, तर ४ हजार ४०४ जणांचे प्राण वाचले. अगदी मोफत पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवेमुळे वैद्यकीय मदत नागरिकांना वेळेत पोहोचू शकल्याने अनेकांना नवजीवन देण्याचे काम त्यामुळे साध्य झाले आहे.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांना अपुऱ्या सुविधा
जिल्ह्यातील कोविड सेंटर वेगवेगळ्या भागात असल्याने कोरोना रुणांना सेंटरपर्यंत ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असतानाही रुग्णवाहिका सेवा पालघर जिल्ह्यात सरस ठरली आहे.
२०१४ पासून जिल्ह्यात तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी एकूण २९ रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
जिल्ह्यात १०८ च्या २९ रुग्णवाहिका असून, ११ रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या. जुलै ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना, २४ तास सेवा दिली. आता जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत असल्याने कोरोनासाठी असलेल्या रुग्णवाहिकाही कमी करण्यात येतील.
-अमित वडे,
पालघर पर्यवेक्षक