६० हजारांपैकी १० हजार रिक्षाचालकांच्या नोंदीच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:35+5:302021-06-05T04:28:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाच्या कडक निर्बंधांच्या काळात रिक्षाचालकांना १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य राज्य शासन देणार आहे. मात्र, त्यासाठी ...

६० हजारांपैकी १० हजार रिक्षाचालकांच्या नोंदीच नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाच्या कडक निर्बंधांच्या काळात रिक्षाचालकांना १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य राज्य शासन देणार आहे. मात्र, त्यासाठी अनेक रिक्षाचालकांचे आधारकार्ड बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे हे काम करण्याचे मोठे आव्हान कल्याण आरटीओसमोर असून, आतापर्यंत ६० हजारांपैकी १० हजार रिक्षांच्या नोंदीदेखील झालेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिना अखेरीस उद्दिष्ट असलेल्या ४० हजार रिक्षाचालकांच्या त्यासंदर्भातील नोंदी कशा करायच्या, हा मोठा प्रश्न आरटीओसमोर आहे.
उपप्रादेशिक अधिकारी तानाजी चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. आधारकार्ड लिंक करण्यासाठी आरटीओ कार्यालयात दोन केंद्रे उघडली आहेत. शुक्रवारपासून हे काम करण्यात येणार होते. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत १० हजारांचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य असल्याचे चव्हाण म्हणाले. आधी सॉफ्टवेअर मिळत नव्हते. त्यापाठोपाठ आता ही समस्या समोर आल्याने रिक्षाचालकांना मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे. सुरुवातीला रिक्षाचालकांना इंटरनेटची आवश्यक लिंक मिळत नव्हती. मिळाली तर सतत हँग होत असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे रिक्षा संघटनांनी नाराजी दर्शवली होती. कल्याण उपप्रादेशिक परिवहनची बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, मुरबाड अशी मोठी हद्द आहे. त्यामध्ये येणाऱ्या सुमारे ६० हजार रिक्षाचालकांना ती मदत मिळणार आहे; पण त्यात परवाना, आधारकार्ड, बँक खाते, लायसन्स, बॅच आदी समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत असून, प्रत्यक्ष मदत मिळायला आणखी किती वेळ लागेल, हे आताच सांगता येणार नाही, असेही अधिकारी म्हणाले.