अन्यथा कोळीसमाजाचे तीव्र आंदोलन
By Admin | Updated: November 10, 2015 00:04 IST2015-11-10T00:04:43+5:302015-11-10T00:04:43+5:30
शहापूर तालुक्यातील खर्डी मधील आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्या जमिनी आणि घरे ही पिढ्यान्पिढ्या आहेत. परंतु या जमिनी फसवणूकीने आपल्या नावे करून घेणाऱ्या खर्डीच्या तत्कालीन

अन्यथा कोळीसमाजाचे तीव्र आंदोलन
ठाणे : शहापूर तालुक्यातील खर्डी मधील आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्या जमिनी आणि घरे ही पिढ्यान्पिढ्या आहेत. परंतु या जमिनी फसवणूकीने आपल्या नावे करून घेणाऱ्या खर्डीच्या तत्कालीन सरपंचाविरुद्ध कारवाई करून त्या मूळ मालकांना महिन्याभरात न दिल्यास राज्यभरात उग्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी दिला.
खर्डी येथील सरपंच दिलीप अधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग करून गावठाण जमिनी नावावर केल्याप्रकरणी स्थानिक भूमीपुत्रांना न्याय मिळावा, दोषींवर कारवाई होण्यासाठी आदीवासी कोळी समाज हक्क बचाव समितीने उपोषण केले. या उपोषणकर्त्यांची तरे तसेच शहापूर तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी भेट घेतली. यावेळी नायब तहसीलदार संदिप थोरात हेही उपस्थित होते.
याच मागण्यांचे निवेदन यापूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी शहापूर तहसीलदार यांना याप्रकरणी योग्य ती चौकशी करण्याचे आदेश देऊन अहवाल सादर करायला सांगितला होता. परंतु १० दिवस झाले तरी तहसीलदारांनी चौकशी करण्यास दिरंगाई केल्याच्या निषेधार्थ हे उपोषण केले होते.
यावेळी शहापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर यांची देखील त्यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन वरील मागण्या केल्या. यावेळी समितीचे अध्यक्ष निखिल बेडकुळ, शंकर खाडे, दिपक पारधी, बाळकृष्ण सुकटे, महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिव मदन भोई, ठाणे शहर संघटक योगेश कोळी, प्रशांत खर्डीकर, शहापूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक हरेश पाष्टे, गजानन गोरे आणि शहापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आता तहसीलदार कोणती कारवाई करतात व त्यावर जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण महादेव कोळी समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.
(वार्ताहर)