..अन्यथा आंदोलन छेडावे लागेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST2021-09-02T05:27:53+5:302021-09-02T05:27:53+5:30
डोंबिवली : पूर्व-पश्चिमेतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, केडीएमसीचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा नाहक त्रास नागरिक, ज्येष्ठ नागरिक, ...

..अन्यथा आंदोलन छेडावे लागेल!
डोंबिवली : पूर्व-पश्चिमेतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, केडीएमसीचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा नाहक त्रास नागरिक, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, वाहनचालक यांना होत आहे. लवकरात लवकर रस्त्यांमधील खड्डे न भरल्यास आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा रिपब्लिकन रिक्षाचालक-मालक युनियन आणि मनसे रस्ते साधन-सुविधा व आस्थापना विभागाच्या वतीने मनपाला देण्यात आला आहे.
डोंबिवली ‘फ’ प्रभाग क्षेत्रातील स.वा. जोशी हायस्कूलजवळील रस्ता, सारस्वत कॉलनी, पंचायत बावडी, ठाकुर्ली रेल्वेस्थानक परिसराजवळील रस्ता, जुने हनुमान मंदिर येथील रस्त्यांची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. गणेशोत्सव नजीक येऊन ठेपला आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे तातडीने करणे आवश्यक आहे. खड्ड्यांमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये. सात दिवसांत रस्त्यांची डागडुजी करावी, अन्यथा आंदोलनाचे स्वरूप तीव्र असेल, असा इशारा मनसे रस्ते साधन-सुविधा व आस्थापना विभागाचे डोंबिवली शहर संघटक ओम लोके यांनी निवेदनाद्वारे मनपाचे ‘फ’ प्रभाग अधिकारी भरत पाटील यांना दिला आहे तर दुसरीकडे रिपब्लिकन रिक्षाचालक-मालक युनियननेही मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनात रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले आहे. रस्ते नाही सुधारले तर ७ सप्टेंबरला महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा युनियनचे डोंबिवली शहर अध्यक्ष रामा काकडे यांनी दिला आहे.