जागतिक वनदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST2021-03-23T04:42:33+5:302021-03-23T04:42:33+5:30
मुरबाड : पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी आणि ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी तरुणांनी एकत्र यावे, या विचाराने जागतिक वनदिनाचे औचित्य साधून ...

जागतिक वनदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
मुरबाड : पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी आणि ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी तरुणांनी एकत्र यावे, या विचाराने जागतिक वनदिनाचे औचित्य साधून ठाणे वनपरिक्षेत्र, मुरबाड वनपरिक्षेत्र (पश्चिम) आणि अश्वमेध प्रतिष्ठान, मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने मासले, बेलपाडा येथे अश्वमेध भवनमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यावरण संवर्धनात योगदान देत असताना तरुणांनी आपद्ग्रस्त परिस्थितीत स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे, यासाठी पर्यावरणप्रेमी, सर्पमित्र दत्ता बोंबे (अग्निशमन विभाग, अंबरनाथ) व पर्यावरणप्रेमी हेमंत जाधव यांनी कल्याण, भिवंडी, बदलापूर, मुरबाड, ठाणे या परिसरांतून आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना रेस्क्यू मॅनेजमेंटचे प्रशिक्षण दिले. तसेच, प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. याचवेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि त्यातून कृषीपूरक व्यवसाय संधी असणाऱ्या मधुमक्षिकापालन आणि संवर्धन या विषयावर आंबी तथा मधुमक्षिका अभ्यासक व संशाेधक प्रा. हेमंतकुमार डुंबरे (निवृत्त प्राध्यापक, कृषी महाविद्यालय) यांनी उपस्थित तरुण, परिसरातील शेतकरी व पर्यावरणप्रेमींना पाॅवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी हिरवे (सब डीएफओ, ठाणे वनपरिक्षेत्र), रमेश रसाळ (आरएफओ वनपरिक्षेत्र, मुरबाड) विविध परिसरांतून आलेले अभ्यासक, शेतकरी, ग्रामस्थ, प्रशिक्षणार्थी तरुण उपस्थित होते. तरुणांची प्रश्नोत्तरे आणि विचार संवादातून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्वमेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश हरड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनविभाग ठाणे, वनविभाग मुरबाड, अश्वमेध प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.