The order was issued by the corporation declaring the club house, Hall Coved Care Center in the society | सोसायटी मधील क्लब हाऊस, हॉल कोव्हीड केअर सेंटर घोषीत महापालिकेने काढला आदेश

सोसायटी मधील क्लब हाऊस, हॉल कोव्हीड केअर सेंटर घोषीत महापालिकेने काढला आदेश

ठाणे : दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यातही यामध्ये अनेकांना या आजाराची कोणतीही लक्षणे नसलेले आणि त्रास नसलेले रुग्णांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे या रुग्णांच्या दृष्टीने महापालिकेने आता आणखी एक पाऊल उचलले आहे. एखाद्या गृहनिर्माण सोसायटीत कोरोनाचा कोणतेही लक्षणे नसलेला रुग्ण आढळला तर अशा रुग्णांसाठी गृहनिर्माण संस्थामधील क्लब हाऊस किंवा मल्टीपर्पज हॉल हे आता कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषीत करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिली आहे. तसा आदेश पारीत करण्यात आला असून त्यानुसार या आदेशाची प्रत मिळाल्यापासून पुढील तीन दिवसात क्लब हाऊस आणि मल्टीपर्पज हॉल यासाठी आरक्षित करावेत असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
           कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिस्तरीय वैद्यकीय आस्थापना निर्माण करण्यासाठी राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही यामध्ये कोरोनाची कोणतेही लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण हे जवळ जवळ ८० टक्यांच्या आसपास आहे. परंतु ज्या रुग्णांना खरोखर रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, त्यांना रुग्णालय उपलब्ध व्हावे म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार आता सोसायटीमधील क्लब हाऊस किंवा मल्टीपर्पज हॉल हे आता कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषीत करण्यात आल्याचे आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. त्यानुसार हे परिपत्रक प्राप्त झाल्यापासून पुढील तीन दिवसात गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी महापालिकेच्या coronacelltmc@gmail.com या मेल आयडीवर मेलद्वारे कोव्हीड केअर सेंटरची नोंदणी करावी, सदर क्लब हाऊसमध्ये संबधींत सोसायटीमधील सदस्यांना अलगीकरण करता येणार आहे. सोसायटीबाहेरील सदस्यांना त्यांच्या सोसायटी बाहेरील नातेवाईकांना सोसायटीच्या क्वॉरन्टाइन सेंटरमध्ये आणता येणार नाही, सोसायटीच्या क्वॉरन्टाइन सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सदस्यांची मागणी निर्माण झाल्यास प्रथम आलेल्या सदस्याला क्वॉरन्टाइन करणे, हे नियमानुसार असेल. या सेंटरमध्ये अलगीकरण झालेल्या सदस्यास त्यांच्या कुटुंबाकडून चहा, पाणी, नास्ता, भोजन आदी पुरविण्यात येईल, आवश्यक असल्यास त्यासाठी सेफ्टी कीट (मास्क) यांचा वापर करावा, कुटुंबातील सदस्यांनी क्वॉरन्टाइन सेंटरमध्ये ठराविक लांब अंतरावर खाद्यपदार्थ ठेवणे व क्वॉरन्टाइन झालेल्या सदस्याने सदरच्या बाबी तेथून स्वत: घेऊन जाणे आवश्यक राहिल. रुग्णास खाद्य पदार्थ देतांना नॉन रेस्युबेल साहित्याचा वापर करणे बंधनकारक असणार आहे, संबधींत क्वॉरन्टाइन सेंटरची साफसफाई रुग्णांना स्वत: करावी लागले. किंवा पीपीई कीट परिधान केलेल्या प्रशिक्षित कर्मचाऱ्याकडून अशी साफसफाई करुन घेता येईल.
क्वॉरन्टाईन सेंटरमधून निघणारा कचरा हा बायो मेडीकल वेस्टला देणे बंधनकारक राहिल, संबधींत सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेले डॉक्टर्स अशा रुग्णांची देखभाल करतील, तथापी सोसायटीमध्ये वास्तव्याला डॉक्टर्स नसल्यास महापालिकेकडून वैद्यकीय अधिकारी प्राप्त करुन घेणे सोसायटीला बंधनकारक राहिल. सोसायटीमधील देखरेख करावयाच्या डॉक्टर्सचे मानधन, देण्याची जबाबदारी संबधींत रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबाची किंवा सोसायटीची असेल. संबधीत क्लब हाऊसमध्ये जम्बो आॅक्सीजन सिलेंडर, व आॅक्सीजन पुरविणारी मास्क ठेवणे संबधींत सोसायटीला बंधनकारक असणार आहे, जम्बो आॅक्सीजन सिलेंडर प्राप्त करुन घेण्यासाठी तांत्रिक सहाय्य सोसायटीमधील उपलब्ध डॉक्टर्स यांनी द्यायचे आहे. किंवा जर ते उपलब्ध नसेल तर आणि तांत्रिक सहाय्यक आवश्यक असल्यास सदरचे सहाय्य ठाणे महापालिकेकडून उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
या सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत व कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याबाबत एक लेखी सहमती पत्र संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिव यांनी परिपत्रक प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ३ दिवसाच्या आत ठाणे महापालिकेला लेखा कळवावे असेही महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Web Title: The order was issued by the corporation declaring the club house, Hall Coved Care Center in the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.