भुयारी मार्गाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
By Admin | Updated: April 1, 2017 05:23 IST2017-04-01T05:23:29+5:302017-04-01T05:23:29+5:30
घोडबंदर रोडवरील कापूरबावडीनाका व तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी वाहनांना

भुयारी मार्गाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
ठाणे : घोडबंदर रोडवरील कापूरबावडीनाका व तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी वाहनांना येजा करण्यास भुयारी मार्ग बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी केली. या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश एमएमआरडीए आयुक्तांना दिल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
घोडबंदर रोडवरील कापूरबावडीनाका येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या अर्थसाहाय्याने एमएसआरडीसीमार्फत उड्डाणपूल बांधला असून तो सिनेवंडर येथे संपतो. त्यापासून १५० मी अंतरावर तत्त्वज्ञान विद्यापीठ येथे जंक्शनवर सिग्नल असून येथून घोडबंदरच्या डाव्या बाजूच्या वसंत विहार, हिरानंदानी मिडोज, पवारनगर, गांधीनगर, भवानीनगर तसेच उजवीकडील कोलशेत रोड, ढोकाळी, हायलंड, मनोरमानगर या भागातून येजा करण्यासाठी एकमेव मार्ग आहे. त्यामुळे ठामपामार्फत येथे पादचारी पुलाचे बांधकाम हाती घेतले आहे. या सिग्नलवर सकाळ, सायंकाळ कॅडबरी व नितीन कंपनी उड्डाणपुलापर्यंत दोन ते तीन किमी वाहनांच्या रांगा लागत असून त्यामुळे नाशिककडे जाणाऱ्या वाहनांनादेखील वाहतूककोंडीचा फटका बसत आहे. (प्रतिनिधी)