'Order of Australia' award to Vijay Joshi | विजय जोशी यांना 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' पुरस्कार

विजय जोशी यांना 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' पुरस्कार


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोखंडापासून निघणाऱ्या मळीचे रिसायकलिंग करून टिकाऊ रस्तेबांधणीचे तंत्रज्ञान विकसित करणाºया डॉ. विजय जोशी यांना आॅस्ट्रेलियन सरकारने 'आॅर्डर आॅफ आॅस्ट्रेलिया' हा मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. भारतातील पद्मश्री पुरस्काराच्या दर्जाचा हा सन्मान आहे.
जोशी हे मूळचे ठाणेकर असून मो.ह. विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी व्हीजेटीआयमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर मास्टर्स ही पदवी मिळवली. पुढे टाटा, हमफ्रीज अ‍ॅण्ड ग्लेक्सो (आताची जेकब इंजिनीअरिंग) या उद्योग समूहांमध्ये त्यांनी काम केले. तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्स येथे कार्यरत असताना २५० फूट उंच प्रिलिंग टॉवरच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. मस्कत येथे काही काळ अनुभव घेतल्यानंतर न्यूझीलंड येथील वास्तव्यात त्यांनी रस्तेबांधणीच्या कामात विशेष प्रावीण्य मिळविले. गेल्या २० वर्षांपासून ते सिडनी येथे स्थायिक आहेत. तेथे स्टील उत्पादनात वाया जाणारे घटक रस्त्यांसाठी कसे वापरता येतील, या विषयावरचा प्रबंध पूर्ण करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. लोखंडापासून निघणाºया मळीचा (स्लॅग) उपयोग करून रस्तेबांधणीचे नवे तंत्र त्यांनी विकसित केले.
आॅस्ट्रेलियातील प्रमुख रस्त्यांसह सिडनी एअरपोर्टच्या तिसºया रनवेसाठी हेच तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. उत्तम दर्जाचे आणि टिकाऊ रस्ते त्यातून बांधले गेले. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आॅस्ट्रेलियात रस्तेबांधणीतील रेती, खडी आणि अन्य सामग्री अशी मिळून दोन कोटी टन (मुंब्रा पारसिक डोंगराएवढे पाच डोंगर भरतील एवढी खडी व माती) एवढ्या प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत झाली. याच कार्यासाठी आॅस्ट्रेलियन सरकारने त्यांना 'आॅर्डर आॅफ आॅस्ट्रेलिया' हा पुरस्कार प्रदान केला आहे.

Web Title: 'Order of Australia' award to Vijay Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.