देवस्थानांच्या सरकारीकरणाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:02 IST2018-07-22T00:01:47+5:302018-07-22T00:02:20+5:30
‘हिंदू जनजागृती’ची ठाण्यात निदर्शने

देवस्थानांच्या सरकारीकरणाला विरोध
ठाणे : शनी-शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या व्यवस्थापनामध्ये सरकारीकरणाचा निर्णय घेऊन राज्य सरकारने हिंदूंच्या भावनांशी खेळू नये. मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारकडून शासकीय समित्या स्थापन केल्या जात आहेत. पण, देवस्थानचे सरकारीकरण सुरू करणे शासनाने वेळीच थांबवणे आवश्यक आहे. या शासकीय समित्यांनी देवांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून येथील हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्याविरोधात ठाणे स्टेशनवर तीव्र निदर्शने करून निषेध व्यक्त केला.
मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला मारल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी त्याचा जाहीर निषेध केला. देवनिधी लुटणाऱ्या व्यक्तींना शिक्षा न देणाºया शासनाला श्री शनैश्वर देवस्थान ताब्यात घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. शासनाने या देवस्थानचे सरकारीकरण तत्काळ रद्द करावे आणि मंदिर पुन्हा भक्तांच्या ताब्यात द्यावे. अन्यथा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा येथील या राष्ट्रीय आंदोलनाच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने देण्यात आला. यावेळी हिंदुत्वनिष्ठांनी हातात फलक धरून शासनाविरोधात घोषणा दिल्या.