Opposition to Dissociate shivsena bjp Alliance voting share | युतीचे मताधिक्य फोडण्याचे विरोधकांसमोर आव्हान

युतीचे मताधिक्य फोडण्याचे विरोधकांसमोर आव्हान

अनिकेत घमंडी।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्वीच्या कल्याण, तर आताच्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघावर भाजपची २००९ पासून मजबूत पकड आहे. अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे तीन लाख ४४ हजार ३४३ मताधिक्याने निवडून आले.

त्यामध्ये डोंबिवली मतदारसंघात मतदान केलेल्या एक लाख ४१ हजार ४१० मतदारांपैकी एक लाख १२ हजार ५३७ मतदारांनी महायुतीच्या पारड्यात मतदान केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युती असताना शिवसेनेला ९० हजार ३५९, राष्ट्रवादी काँग्रेसला १८ हजार १७४ आणि मनसेला २६ हजार ५३९ मते पडली होती. मतांची आकडेवारी बघता डोंबिवली हा भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट झाले असून, युतीचे मताधिक्य फोडण्याचे हे कडवे आव्हान विधानसभा निवडणुकीत विरोधकांसमोर असेल.


विधानसभा निवडणुकीत भाजपने दीड लाख मतदारांचे लक्ष्य ठेवले असून, त्यादृष्टीने बुथरचना, इमारतप्रमुख अशी रचना करून कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे बांधले आहे. मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनादेखील तयारीला लागले आहे. मनसे वगळता अन्य दोन्ही विरोधी पक्षांचे अस्तित्व फारसे दिसत नाही. भाजपसाठी शिवसेनाच तुल्यबळ विरोधी पक्ष होता. मात्र, लोकसभेत युती झाल्यापासून भाजपसाठी पर्यायी प्रखर विरोधी पक्ष समोर येऊ शकला नाही. रस्ते, वीजपुरवठा, वाहतूककोंडी, अस्वच्छता, अनधिकृत बांधकामे यासारख्या नागरी समस्यांची या मतदारसंघातही उणीव नाही. त्या सोडवण्यात महापालिका प्रशासन कमी पडत असून, त्यासाठी निधीचा अभाव हे कारण नेहमीच पुढे करण्यात येते. या समस्यांचा परिणाम पायाभूत सुविधांवर झाला आहे. त्यामुळे चव्हाण यांनी निधी आणणे आवश्यक होते, अशी नागरिकांची भावना आहे. अशातच, डोंबिवलीच्या कोपर दिशेकडील उड्डाणपुलाचा प्रश्न चव्हाण यांनी सोडवल्यात जमा आहे. सध्याच्या उड्डाणपुलाव्यतिरिक्त १२.५ मीटरचा आणखी एक उड्डाणपूल करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी आणण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरी झालेल्या या निर्णयाने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे, गेल्या तीन महिन्यांत विरोधकांसह महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर टीका करण्यापेक्षा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले असते, तर सर्वच पक्षांच्या इच्छुकांसाठी ती निवडणूक प्रचारात जमेची बाजू ठरली असती.


२००९ मध्ये चव्हाण यांनी मनसेचे उमेदवार राजेश कदम यांचा १२ हजार ३२७ मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीत युती नसतानाही चव्हाण यांनी शिवसेनेचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा पराभव करून ४६ हजार २२५ मताधिक्य मिळवले होते. कोकणपट्ट्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवणारा डोंबिवली हा दुसरा मतदारसंघ ठरल्याने चव्हाण यांच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ पडली. मुख्यमंत्र्यांनी दांडगा जनसंपर्क लक्षात घेत त्यांना पालघर, रायगड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँगे्रसचे आनंद परांजपे यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला होता. तेव्हाही डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून मिळालेल्या ९० हजार मतांचा मोलाचा वाटा होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यात २२ हजारांची भर पडली. डोंबिवली विधानसभेमध्ये सुमारे तीन लाख मतदार आहेत. यामध्ये ब्राह्मण, आगरी, कोकणी, दक्षिण भारतीय, गुजराती, जैन, उत्तर भारतीय, केरळीयन, कर्नाटक अशा विविध ठिकाणच्या मतदारांचा समावेश आहे.

लोकसभेत युती झाली नसती तर, रवींद्र चव्हाण हेच खासदारकीला उभे राहणार होते. तसे झाले असते तर, चव्हाण यांची जागा घेण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक, नेते सरसावले होते. परंतु, युतीची घोषणा झाल्याने पक्षातील अन्य इच्छुकांचा हिरमोड झाला. बहुतांश नगरसेवक वॉर्डापुरते काम करतात. विधानसभेची व्याप्ती लक्षात घेऊन जनसंपर्क करणे, शहरातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे, यात कुणाचेही सातत्य नसल्याने चव्हाण यांना पक्षातूनच पर्याय निर्माण होऊ शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मनसे हा एकमेव पक्ष भाजप, शिवसेनेला सडकून विरोध करत आहे. या पक्षामध्ये विधानसभेसाठी मंदा पाटील, गटनेते मंदार हळबे, परिवहनचे माजी सदस्य प्रल्हाद म्हात्रे, माजी नगरसेवक हर्षद पाटील, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर आदी इच्छुक आहेत. मनसेने उमेदवार निश्चित केला नसल्याने कामाला तरी कसे लागायचे, या पेचात मनसैनिक आहेत. तरीही, सर्वच इच्छुकांनी काम सुरू केले आहे. या प्रयत्नांना सामूहिक बळ येणे अत्यावश्यक असून त्यासाठी राजेश कदम प्रयत्न करत आहेत. राजू पाटील हे चव्हाण यांच्याविरोधात उभे राहिले, तर मात्र लढत चुरशीची होऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आघाडी करणार की स्वतंत्र लढणार, हे अजून निश्चित झालेले नाही. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवराज पवार आणि शहराध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे हे इच्छुक आहेत. काँगे्रसमधून नगरसेवक नंदू म्हात्रे, राधिका गुप्ते, दिलीप गायकवाड, जोजो थॉमस ही नावे पुढे आली आहेत. या संभाव्य उमेदवारांनी मतदारांवर प्रभाव पाडण्याचे काम हवे तसे सुरू केलेले नाही.


वेळ आल्यास भाजपचा बालेकिल्ला ही ओळख पुसण्यासाठी शिवसेनाही फिल्डिंग लावून आहे. युती तुटली तर, दीपेश म्हात्रे किंवा ज्येष्ठ नगरसेवक राजेश मोरे हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. युती झाली तरीही अपक्ष उमेदवारी लढवण्याचीही काहींनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. चव्हाण हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असले तरी, प्रतिस्पर्धी कोण राहील, या मतदारसंघात वर्षानुवर्षे घर करून असलेल्या नागरी समस्यांना मतदार कितपत प्राधान्य देतात, विरोधक किती दमाने लढतात यावरही बरेच काही अवलंबून आहे.

Web Title: Opposition to Dissociate shivsena bjp Alliance voting share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.